आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे 2 परवाने; दोनच दिवसात भुमरेंनी केला प्रतिज्ञापत्रात बदल
Sandipan Bhumare: मंत्री भुमरेंच्या पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे दोन परवाने असल्याची कबुली दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात दिली. 2020 मध्ये पत्नीचे उत्पन्न शून्य रुपये होते. आथा 2023 मध्ये हा 14.86 लाख झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhaji Nagar) शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी दोनच दिवसांत प्रतिज्ञापत्रात बदल केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदा त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवला होता. मात्र, काल दाखल केलेल्या दुसऱ्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात भुमरेंनी त्यांच्या पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्यविक्री परवाने असा नमूद केला आहे. दोनच दिवसात प्रतिज्ञापत्रात बदल केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे शिलेदार आणि मंत्री संदीपान भुमरेंना महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यात आले. त्यानंतर, संदीपान भुमरेंनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जात त्यांनी आपल्या संपत्ती जाहीर केली असून मंत्रीपदावर आल्यानंतर गेल्या 4 वर्षात त्यांच्या संपत्तीत अडीचपटीने वाढ झाल्याचं दिसून आले. त्यानंतर त्यांच्यावर टीका देखील झाली. भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात दारु दुकानांची माहिती का दडवली, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी उपस्थित केला होता. त्यानंतर भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात दारुच्या दुकानांचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे मद्याच्या दुकानावरुन विरोधक भुमरेंवर टीका करत असतानाच त्यांनी अधिकृतपणे प्रतिज्ञापत्रात या मद्याच्या दुकानांचा उल्लेख केला आहे.
तीन वर्षांत पत्नीचे उत्पन्न शून्यावरून 14 लाख
भुमरेंनी दाखल केलेल्या अर्जात पत्नी भुमरे यांचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवला होता. मंत्री भुमरेंच्या पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे दोन परवाने असल्याची कबुली दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात दिली. 2020 मध्ये पत्नीचे उत्पन्न शून्य रुपये होते. आथा 2023 मध्ये हा 14.86 लाख झाले आहे.
भुमरे यांची संपत्ती 5.70 कोटींच्या वर
राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची संपत्ती मंत्रिपदाच्या काळात तब्बल अडीचपटीने वाढली आहे. त्यांच्याकडील मालमत्तेचे बाजारमूल्य 5.70 कोटींच्या वर आहे. भुमरेंकडे 28 लाखांची फॉर्च्यूनर कार आहे. सोन्याच्या बाबतीत दोन्ही शिवसैनिक सारख्याच पातळीवर आहेत. खैरेंकडे 43 तोळे, तर भुमरेंकडे 45 तोळे सोने आहे. दरम्यान, 2019 साली संदीपान भुमरेंची संपत्ती 2 कोटी एवढी होती. गेल्या 4 वर्षांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या संपत्तीत अडीच पटींनी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे भुमरेंपेक्षा अधिक श्रीमंत आहेत. मात्र, खैरेंच्या संपत्तीत कोणतीही वाढ झाली नसून ती कमीच झाल्याच दिसून येत आहे.
हे ही वाचा :