Sameer Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ? आज अधिकृत घोषणेची शक्यता
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाची माळ समीर भुजबळ यांच्या गळ्यात पडली आहे.
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज दुपारी चार वाजता गरवारे क्लब इथे बैठक घेऊन अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असून त्यात यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
नवाब मलिक (Nawab Malik) वैद्यकीय कारणास्तव बैठकांसाठी आणि पक्षीय कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यामुळे अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय शिवाजीराव नलावडे (Shivajirao Nalawade) मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे समीर भुजबळ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते.
शिवाजीराव नलावडेंना विरोध, समीर भुजबळांना पसंती
नवाब मलिक जेलमधून जरी बाहेर आले असले तरी वैद्यकीय कारणास्तव सध्या ते पक्षीय कामकाजात सहभागी होताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदाची माळ दुसऱ्याच्या गळ्यात पडावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. या पदासाठी मुंबईतून शिवाजीराव नलावडे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शिवाजीराव नलावडे यांच्या नावाला प्रचंड विरोध होता. त्यामुळे समीर भुजबळ यांच्या गळ्यात मुंबई अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आज गरवारे क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मलिक यांना वैद्यकीय आधारावर जामीन पण...
दरम्यान, सचिन अहिर यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यानंतर नवाब मलिक तुरुंगात होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांना वैद्यकीय आधारावर सुप्रीम कोर्टाकडून दोन महिन्यांचा जामीन मिळाला. परंतु राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपला पाठिंबा कोणाला याबाबत त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही.