Samantha-Naga Divorce : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटासाठी 'ही' व्यक्ती कारणीभूत, मंत्र्याचा दावा; समंथाची कडक शब्दात टीका, नागा चैतन्यकडूनही अभिनेत्रीची पाठराखण
Samantha on Minister Who Linked KTR To Her Divorce : नागा चैतन्य आणि त्याचे वडील अभिनेता नागार्जुन यांनी मंत्री कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत म्हणाले की, राजकारणापासून दूर राहणाऱ्या चित्रपट कलाकारांना यात ओढू नये.
Samantha-Naga Chaitanya Divorce : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला. आता दोघेही स्वत:च्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटासाठी बीआरएस नेते केटी रामाराव (KTR) जबाबदार असल्याचं वक्तव्य मंत्री सुरेखा यांनी केलं आहे.
समंथा-नागाच्या घटस्फोटाबाबत मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांचा ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट झाला. दोघांचे लग्न चार वर्षेही टिकू शकलं नाही. या दोघांच्या घटस्फोटाबाबत तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी मोठा दावा केला आहे. मंत्री कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्यावर समंथाने नाराजी व्यक्त करत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. समंथाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट केली आहे, जी वेगाने व्हायरल होत आहे.
समंथाची कडक शब्दात टीका
मंत्री कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्यावर नागा चैतन्य आणि त्यांच्या कुटुंबासह विरोधी पक्षानेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर समंथानेही प्रतिक्रिया दिली आहे. समंथाने इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करून रोखठोक उत्तर दिलं आहे. समंथाने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, घटस्फोट ही वैयक्तिक बाब आहे, त्याला राजकारणापासून दूर ठेवणे उत्तम.
काय म्हणाली समंथा?
समंथाची इंस्टा स्टोरीवर लिहिलं आहे, 'एक स्त्री असणे आणि बाहेर पडणे आणि काम करणे आणि एका ग्लॅमरस उद्योगात टिकून राहणे, जिथे महिलांना बहुतेक प्रॉप्ससारखे वागवले जाते. प्रेमात पडणे, ठेच लागणे आणि उठणे आणि पुन्हा लढणे, त्यासाठी खूप हिंमत लागते. कोंडा सुरेखा गरु... मला माझ्या प्रवासाचा अभिमान आहे. कृपया माझ्या प्रवासावर चिखलफेक करू नका. मला आशा आहे की, मंत्री या नात्याने तुमचे बोलणे खूप महत्त्वाचे आहे, याची तुम्हाला कल्पना असेल. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही लोकांच्या गोपनीयतेबद्दल जबाबदार राहून आदर बाळगावा.'
समंथाची इंस्टा स्टोरी
नागा चैतन्यकडूनही समंथाची पाठराखण
अक्किनेनी नागा चैतन्य यानेही याबाबत सोशल मीडिया पोस्टमध्ये तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत लिहिलंय, 'घटस्फोटाचा निर्णय हा जीवनातील सर्वात वेदनादायक आणि दुर्दैवी निर्णयांपैकी एक आहे. खूप विचार केल्यानंतर, मी आणि माझ्या पूर्वीश्रमीच्या पत्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमच्या जीवनातील वेगवेगळ्या ध्येयांमुळे आणि दोन प्रौढ प्रौढांप्रमाणे आदर आणि सन्मानाने पुढे जाण्याच्या हितासाठी हा शांततेत घेतलेला निर्णय होता. परंतु, या प्रकरणावर आतापर्यंत विविध निराधार आणि पूर्णपणे हास्यास्पद गॉसिप्स होत आहेत. माझ्या पूर्वीश्रमीच्या पत्नीविषयी तसेच माझ्या कुटुंबाविषयीच्या आदरापोटी मी आतापर्यंत या सर्व गोष्टींबाबत मौन बाळगलं. मंत्री कोंडा सुरेखा गरु यांनी केलेला दावा खोटाच नाही तर निव्वळ हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. महिलांना पाठिंबा आणि सन्मान मिळायला हवा. प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चेत येण्यासाठी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांचा गैरफायदा घेणे आणि शोषण करणे, हे लज्जास्पद आहे.'
— chaitanya akkineni (@chay_akkineni) October 2, 2024