''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
पंढरीच्या वारीतील दिंडींमध्ये, पालखीत पायी चालत जाण्यासाठी अनेक नेतेमंडळी हिरीरीने सहभागी होत असल्याचे दिसून येते.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत पुन्हा एकदा तुफानी फटकेबाजी केली. आपल्या भाषणातून राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं. या योजनेवरुन चिमटे काढणाऱ्या विरोधकांना मिश्कील टोलेही लगावले. वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची सभागृहात माहिती देताना मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना वारीत माझ्यासोबत न्यायला तयार असल्याचे अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटले. त्यासोबतच, अप्रत्यक्षपणे काका शरद पवार यांना टोलाही लगावल्याचं पाहायला मिळालं. तत्पूर्वी, अर्थसंकल्प (Budjet) सादर करण्यावरुनही जयंत पाटील यांना कवितेतून जशास तसे प्रत्युत्तरही अजित पवारांनी दिलं.
पंढरीच्या वारीतील दिंडींमध्ये, पालखीत पायी चालत जाण्यासाठी अनेक नेतेमंडळी हिरीरीने सहभागी होत असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नेते शरद पवार हेही वारीत पायी सहभागी होणार असून राहुल गांधीही वारीत पायी चालण्याची शक्यता आहे. त्यावरुन, अजित पवारांनी टोला लगावला आणि मीही वारीत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. ''आता, सगळ्यांनाच वारीच्या पालखीत चालत जावसं वाटतंय, मग आपणही सहभागी होऊया, असे म्हणत नाव न घेता गालावर स्मीतहास्य करत अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावल्याचं दिसून आलं. तसेच, जयंतराव येतील का नाही कुणास ठाऊक, पण मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथं घेऊन जायला तयार आहे, असे म्हणत अजित पवारांनी जयंत पाटील यांनाही हसत हसत वारीत सोबत येण्याचं आवाहन केलं.
अर्थसंकल्पावरुन टोला
जयंत पाटील यांनी अर्थमंत्री म्हणून नऊ वेळा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल अजित पवारांनी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं. मात्र, हे करत असताना त्यांनी टोले सुद्धा लगावले. अजित पवार म्हणाले की जयंत पाटील यांनी नऊवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड केला त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे. मात्र, कोणाच्या हाताखाली काम करत असताना सर्व काही ढकलावं लागतं. मोठी जबाबदारी आली की मुड बदलावा लागतो असा टोला लागावला. त्याचबरोबर मी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी एक बघितलं महाविकास आघाडीकडून अर्थसंकल्प मांडला की महायुतीने आरोप करायचे आणि आता महायुतीकडून मांडला तर महाविकास आघाडी आरोप करत आहे. तथापि, मी दोन्ही बाजूने अर्थसंकल्प मांडला हे खरं आहे, असे अजित पवारांनी म्हटले.
View this post on Instagram
विंदा करंदीकरांच्या कवितेतून फटकेबाजी
उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥
अजित पवारांचा काँग्रेसवर निशाणा
सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना वीजबिल माफी केली, मात्र एकाच महिन्यात हा निर्णय मागे घेतला गेला. आता, आम्ही जाहीर केलेल्या चुनावी जुमला असल्याचे ते बोलले जाते. पण, आम्ही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत वीजबिल माफी केली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय पुढेही कायम ठेवायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा आम्हाला येथे पाठवावे लागेल. नाहीतर हे आले तर योजना बंद करणार आहेत, असे म्हणत विरोधकांना टोलाही लगावला. मला राज्याला सांगायचे आहे, लोकोपयोगी योजना आम्ही घोषणा करत आहोत, पण विरोधकांकडून जाणीवपूर्वक त्यात घोळ घातला जात आहे, असेही पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटले.