(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? नारायण राणे आणि उदय सामंत यांच्या गुप्त बैठक
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. या जागेबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये जुहू बंगल्यावर गुप्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत कोण कोणची दिलजमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी या मतदारसंघावर स्वत:दावा केला होता. तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. कारण उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीतील कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार आणि उमेदवार कोण असणार यावरुन अजूनही खलबतं सुरुच आहेत.
ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विनायक राऊत यांचा सामना नारायण राणे आणि मंत्री सामंत यांच्याशी असणार आहे. तर महायुतीकडून कोणी बंडखोरी केली तर त्यांचा फायदाही विनायक राऊत यांना होऊ शकतो. शिवाय ठाकरे गटाकडून आमदार वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांची साथही विनायक राऊत यांना मिळू शकते. त्यामुळे महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा एकच उमेदवार असावा यासाठी दिलजमाई करणारी ही सामंजस्य बैठक आहे का.? असा प्रश्नं राजकिय वर्तुळात विचारला जातोय. कारण महायुतीकडून जर कोणी बंडखोरी केली तर होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना होऊ शकतो. त्यामुळे नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यामधील ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंची ताकद किती?
काही वर्षांपूर्वी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे नारायण राणे यांचे बालेकिल्ले मानले जायचे. पण सध्याच्या घडीला नारायण राणे यांनी ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली, असल्याचं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात. राणेंची ताकद सिंधुदुर्गात असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात म्हणावी इतकी नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राणेंना किती मदत करतात? यावर नारायण राणेंच यश निर्भर असणार आहे. शिवाय, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा रोल महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण किरण सामंतांनी जर राणेंना विरोध केला तर निवडणुकीत विजय मिळवणे त्यांना जड जाऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या