Ranjit Naik-Nimbalkar : माढात विजय कसा मिळवणार? निर्णायक फॅक्टर कोणता? रणजितसिंह निंबाळकरांनी स्ट्रॅटेजी सांगितली
Ranjit Naik-Nimbalkar, Madha Loksabha : सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या मोदी साहेबांच्या धोरणानुसार मी काम केलं. मला ज्यांनी मदत केली, त्यांची नाराजी असेल तर ती नक्की दूर केली जाईल. गेल्यावेळी आपल्याला मोठी आव्हाने होती.
Ranjit Naik-Nimbalkar, Madha Loksabha : "सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या मोदी साहेबांच्या धोरणानुसार मी काम केलं. मला ज्यांनी मदत केली, त्यांची नाराजी असेल तर ती नक्की दूर केली जाईल. गेल्यावेळी आपल्याला मोठी आव्हाने होती. मात्र आता महायुतीची ताकद, पूर्वीचे सहकारी पक्ष आणि आता राष्ट्रवादीही सोबत आली आहे. राष्ट्रवादीच्या येण्याने ताकद वाढलीये", असं भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी सांगितले. टेंभूर्णीत आज (दि.25) माढा लोकसभा मतदारसंघातील कोअर कमिटी आणि क्लस्टर समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी निंबाळकर बोलत होते . यावेळी माढाचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) , माजी आमदार प्रशांत परिचारक , सोलापूर लोकसभेचे उमेदवार आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) , रश्मी बागल , संभूराजे जगताप , गणेश चिवटे , बाबासाहेब देशमुख यांचेसह लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचे प्रमुख उपस्थित होते.
सर्वांना बरोबर घेऊनच ही लढाई लढणार
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, मला मदत केलेले लोक नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल. माढातील नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. ज्यांच्यामध्ये थोडा गैरसमज आहे तो सर्व दूर होईल. सर्वात जास्त चर्चेत माढा लोकसभा मतदारसंघ असला तरी सर्वात जास्त विकास देखील याच मतदारसंघात झालाय. सर्वांना बरोबर घेऊनच ही लढाई लढणार आहोत, जे नाराज असतील त्यांना तर मी उमेदवार म्हणून भेटणार आहेच शिवाय पक्ष ज्यांना भेटायला सांगेल त्यांनाही मी भेटणार आहे, असंही निंबाळकर यांनी स्पष्ट केलं.
एकसंधपणे महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार
पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, पूर्वीची महायुती आणि आजची महायुती यात बदल झाले आहेत. पूर्वी आम्ही वेगळ्या ठिकाणी होतो आता नंतर या महायुतीत राष्ट्रवादी सामील झाली आहे. पूर्वीच्या लोकांचे काही समाज गैरसमज असतात तेही दूर केले जाणार आहेत. एकसंधपणे महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारने हजारो कोटी रुपयाची कामे या मतदारसंघात केली. 85 टक्के मतदारांना पुन्हा मोदी यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे. लवकरच महायुतीमधील सर्व पक्षांशी चर्चा करून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाईल, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
मोहिते पाटील कुटुंबाची नाराजी देखील दूर होणार
किरकोळ मतभेद हे सर्वच पक्षात आणि सर्वच ठिकाणी असतात. मात्र निश्चितपणे पक्षाची भूमिका आणि आमची भूमिका नम्रतेची असल्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. मोहिते पाटील कुटुंबाची नाराजी देखील दूर होणार असून मी त्यांनाही भेटणार आहे. गेल्यावेळी आपल्या समोर मोठी आव्हाने होती. मात्र आता महायुतीची ताकद पूर्वीचे सहकारी पक्ष आणि आता राष्ट्रवादीच्या येण्याने आपली ताकद वाढली आहे. त्यामुळेच अजून समोरचा उमेदवार कोण द्यावा याचा विचार त्यांना करावा लागत असल्याचा टोला निंबाळकर यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या