Madha : रामराजे निंबाळकरांचं ठरलं! भाजपला साथ की मोहिते पाटलांना हात? उद्या माढ्याची दिशा ठरणार
Madha Lok Sabha Election : रणजित निंबाळकर आणि रामराजे निंबाळकरांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेली शिष्टाई कामाला आली की नाही हे गुरूवारी संध्याकाळी समजेल.
सोलापूर: राज्याचं लक्ष लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Election) भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांना तिकीट जाहीर केल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरू झाली. भाजपच्या तिकिटासाठी आग्रही असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel Mohite Patil) प्रचाराला सुरूवात केली असून ते लढणारच हे आता निश्चित झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला नाराज असलेले रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) उद्या, गुरूवारी त्यांची दिशा ठरवणार आहेत. रामराजे निंबाळकर हे वैर विसरून रणजित निंबाळकरांना साथ देणार की बदला घेण्यासाठी मोहिते पाटलांना हात देणार हे काहीच वेळात स्पष्ट होईल. त्याचवेळी शरद पवारही वैयक्तिक कामामुळे फलटणमध्ये असणार आहेत हे विशेष.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा ठरवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहीर केल्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप शमल्याचं दिसत नाही.
रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजेंचा विरोध
रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे गटाचा विरोध आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता रामराजे नाईक निंबाळकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर, संजीव नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
त्याचवेळी शरद पवार गुरूवारी दुपारी फलटणमध्ये असणार आहेत. सुभाष शिंदे या त्यांच्या जुन्या सहकार्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते जाणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर आणि भाजपचे खासदार रणजित निंबाळकर यांचं वैर जुनं आहे. त्यामुळेच रामराजे निंबाळकरांनी रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला होता. तसेच माढ्यातून तिकिटासाठी आग्रही असलेल्या मोहिते पाटलांनीही निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
माढ्यातील तिढा हा सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत रामराजे निंबाळकर आणि रणजित निंबाळकरांनी चर्चा केली. त्यावेळी रामराजे यांनी आपली तलवार म्यान केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आपण आपली भूमिका ही गुरूवारी संध्याकाळी जाहीर करू अशी भूमिका रामराजेंनी घेतल्याने माढ्यातील भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: