Ram Shinde : वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
Ram Shinde : आज कोणीही उठतो आणि सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत स्वतःच्या फायद्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी बदनामीकारक वक्तव्य करतो. हे अतिशय दुर्दैवी असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

Ram Shinde : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) वारंवार होणाऱ्या अवमानावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला (Maharashtra Government) घरचा आहेर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्ह विधाने केली जातात, या मुद्यांवर बोलताना सरकार काय बोळ्याने दूध पितं का? असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि तात्काळ कायदा पारित करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. आता उदयनराजे यांच्या भूमिकेला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावे लागणार, असे म्हणत त्यांनी वाचाळवीरांचे कान टोचले आहे.
राम शिंदे म्हणाले की, आज कोणीही उठतो आणि सोशल मीडियावर किंवा टीव्ही मीडियावर राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत स्वतःच्या फायद्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी बदनामीकारक वक्तव्य करतो. हे अतिशय दुर्दैवी आहे. आपली परंपरा जोपासण्याचे सर्वांचेच कर्तव्य आहे. जर कोणी अशा पद्धतीचे आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील, तर कायद्याने त्याच्यावर कारवाई करणे हे आपल्याला करावे लागणार आहे. आपले संस्कृती जपण्याचे काम हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. याबाबत खासदार उदयन महाराज किंवा संभाजी महाराज यांनी केलेली मागणी योग्य आहे. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार असो आपल्याला याबाबत कठोर कायदा करावा लागणार आहे. त्याशिवाय हे थांबणे अशक्य असल्याचे दिसत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
विधिमंडळ कामकाजाचा स्तर कुठेतरी घसरत चाललाय
दरम्यान, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्याही भूमिकेवर व्यक्त केली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना आपले प्रश्न सुटतील, अशी आशा असते. मात्र यावर चर्चा घडत नाही. सोशल माध्यमात जे विषय चालतात त्याच विषयावर प्रसिद्धीसाठी काहीजण चर्चा घडवितात. यामध्ये नक्कीच सुधारणा होणे गरजेचे असल्याची तीव्र नाराजी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पंढरपूर येथे व्यक्त केली.
आणखी वाचा























