Video : राज ठाकरे 8,10 दिवसांनी, महिन्यांनी जागे झाले की उठतात आणि बोलतात; 'त्या' प्रश्नावर शरद पवारस्टाईल उत्तर, एकच हास्यकल्लोळ
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे.
पुणे : अवघ्या महाराष्ट्राला आज पंढरीच्यां (Pandharpur) पांडुरंगाचे आणि चंद्रभागेच्या तिरी जमलेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे वेड लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केल्यानंतर सोशल मीडियावरही विठुरायाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत हेत. राज्यातील सर्वच बडे नेते आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, समृद्धीसाठी आणि जनतेसाठी बा विठ्ठलाला साकडे घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना वारीची परंपरा आणि एकोप्यावर भाष्य केलं आहे. आत, शरद पवारांना (Sharad Pawar) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ट्विटसंदर्भात विचारले असता, त्यांनी पवारस्टाईलने चिमटा काढला अन् एकच हशा पिकल्याचं दिसून आलं.
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. जातीय तणावात सध्याचा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग पहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी ट्विट करुन, ''आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.'', असे म्हटले आहे. राज ठाकरेंच्या ट्विटच्या अनुषंगाने शरद पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, शरद पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
ते आजच नाही, ज्यावेळीही बोलतात... त्यांचं वैशिष्ट्य आहे. 8-10 दिवसांनी, महिन्यांनी, दोन महिन्यांनी ते कधी जागे झाले की, ते बोलतात. साधारणत: ते अशाच विषयावर टीपण्णी करतात, ज्याची दखल वाचक घेतात, ज्यामुळे उद्याच्या पेपरात बातमी होईल, असे म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंच्या ट्विटची फिरकी घेतली. दरम्यान, राज ठाकरे सकाळी उशिरा उठतात, म्हणून अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा होते, किंवा सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल केलं जातं. त्यामुळे, शरद पवारांच्या उत्तरावर एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.
ट्विटमधून काय म्हणाले होते राज ठाकरे
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे म्हणाले, ''देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर 'महा'राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.''
आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. 'यात्रा' ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण… pic.twitter.com/g96HCoGfK1
— Raj Thackeray (@RajThackeray) July 17, 2024