Raj Thackeray : मोदींना बिनशर्त पाठिंबा, पण शिंदे आणि अजितदादांना पाठिंबा आहे का? राज ठाकरेंचं स्पष्ट उत्तर
Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava 2024 : कार्यकर्त्यांनी कोणताही विचार न करता फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला मतदान करावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
मुंबई: मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसेच्या राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा (Raj Thackeray Supports Narendra Modi) जाहीर केला. यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसून सर्व कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीचं काम करावं अशा सूचना दिल्या. पण फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाबद्दल काय बोलले यावर सध्या चर्चा सुरू आहे.
अजितदादा आणि शिंदेंबद्दल काय?
राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर सभा घेऊन यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. या आधी नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारा आपण होतो, त्यांना विरोध करणाराही आपणच होतो. आता पुन्हा त्यांना आपण बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. त्यावेळी बोलताना फक्त नरेंद्र मोदींसाठी आपण राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपच्या महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं.
या आधी अजित पवार आणि शिंदेंवर जोरदार टीका
राज ठाकरेंनी या आधी राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुंबईतील सुशोभिकरण असो वा इतर अनेक धोरणं असोत, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. तसेच ज्यावेळी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही राज ठाकरेंनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याचा जुना व्हिडीओ शेअर केला होता. तसेच अजित पवाराप्रमाणे आपण वागलो नसून वेगळा पक्ष काढल्याचं सांगत त्यांना टोलाही लगावला होता.
अजित पवार आणि शिंदेंना खरोखर मदत करणार का?
राज ठाकरेंनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला पाठिंंबा जरी जाहीर केला असला तरी त्यांचे कार्यकर्ते खरोखरच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना मदत करणार का हे पहावं लागेल. कारण स्थानिक स्तरावर या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचा वाद असल्याचं दिसतंय.
विधानसभेची तयारी करण्याची कार्यकर्त्यांना सूचना
या आधी 2014 आणि 2019 साली राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या नव्हत्या. त्यामुळे यंदा ते लोकसभेच्या रिंगणात असतील काय याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. पण यंदाही आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नसून मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं. तसेच आता कोणताही विचार न करता कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
ही बातमी वाचा: