आपण यांची लावली आणि सत्तेवर आलो, आता हे आमची लावायला आलेत, व्हायरल फोटोवर राज ठाकरेंचं भाष्य, फडणवीसांची मिमिक्री
Raj Thackeray on Devendra Fadnavis : राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री, म्हणाले, "भुजबळसाहेब, तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून जेलमध्ये"

Raj Thackeray on Devendra Fadnavis , मुंबई : ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय, पण तो संपणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे, असं रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध विषयावर भाष्य केलं. राजकारणात मतभेद असतात, वैर नसतं, पण मतभेद असावेत वैर नसाव असं जरी मी म्हटलं तरी त्या मतभेदातून मैत्रीही नसावी, जसे छगन भुजबळ मंत्रिमंडळात बसले, असा टोलाही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री
यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्रीही केली. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करत, "भुजबळसाहेब तुम्ही स्वातंत्र्यसैनिक म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं नाही, तुम्हाला जेलमध्ये टाकलं, कारण तुम्ही भ्रष्टाचार केला"असं नमूद केलं.
व्हायरल फोटोवर भाष्य
दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोवरही भाष्य केलं. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस मध्ये बसले होते, तर त्यांच्या एका बाजूला अजित पवार, सुनील तटकरे तर दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ बसले होते. या सर्वांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते सर्वजण आता सत्तेत आहेत, अशा अर्थाने हा फोटो व्हायरल होत आहे.
"ज्यावेळी मी हा फोटो पाहिला, त्यावेळी मला पहिला प्रश्न पडला, भाजपचे मतदार आणि भाजपचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील. यांची आपण लावली आणि सत्तेवर आलो, पण हे आता आमची लावायला आलेत, अशी अवस्था भाजप कार्यकर्त्यांची झाली असेल, असं राज ठाकरे म्हणाले.
भूमिका कुणी बदलल्या?
माझ्यावर भूमिका बदलल्या अशी टीका करतात त्यांना मी सांगू इच्छितो, जे विरोधक चांगलं काम करतात त्यांना चांगलं म्हणणं किंवा जे मित्र आहेत आणि चुकीचं वागत असतील तर त्याला चूक म्हणणं याला वेगवेगळ्या भूमिका म्हणत नाहीत. लालकृष्ण अडवाणींनी मंदिर वही बनायेंगे अशी घोषणा केली, मात्र बाबरी पाडली त्यावेळी ते म्हणाले याचा आम्हाला खेद आहे, या भूमिकेला तुम्ही काय म्हणाल, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
मराठी मुसलमान घरात मराठीतच बोलतो
महाराष्ट्रातला मराठी मुसलमान घरात मराठीतच बोलतो, माझ्याशी झहीर खान मराठीतच बोलतो, समोर अमराठी बोलायला आला की आमची मराठी घसरते, असं राज ठाकरे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, करुणा शर्मा यांची मागणी























