Raj Thackeray-Nitesh Rane Meet : राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नितेश राणे म्हणाले...
Raj Thackeray-Nitesh Rane Meet : भाजप आमदार नितेश राणे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नितेश राणेंनी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
Raj Thackeray-Nitesh Rane Meet : कोकणातील राजकारणात (Konkan Politics) सध्या एका भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते सिंधुदुर्गात (Sindhudurg) आहेत. या कोकण दौऱ्यादरम्यान नितेश राणेंनी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज ठाकरे सावंतवाडीमध्ये दाखल झाले त्यावेळी नितेश राणे देखील सावंतवाडीमध्येच होते. त्यामुळे दोघांची भेट होऊ शकते, असं म्हटलं जात होतं. अखेर ही भेट झाली. या भेटीमध्ये दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. परंतु भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. भेटीनंतर नितेश राणे बाहेर आल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी "ही कौटुंबिक भेट होती. यावर मला आणखी काही बोलायचं नाही," अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. तर राज ठाकरे आणि नारायण राणे यांची कौटुंबिक जवळीक यापूर्वीही अनेकदा दिसून आली आहे. परंतु जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होणार नाही, हे अशक्य आहे. त्यामुळे या भेटीचा उद्देश आगामी काळात समजू शकतो.
राज ठाकरे यांचा कोकण दौरा
दरम्यान राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आजपासून सिंधुदुर्गातून दौऱ्याला सुरुवात झाली. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधणार आहेत. सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी ही मनसेची महत्त्वाची बैठक होत आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळी बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते उपस्थित आहेत. तर सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्यातच मनसेची भाजपसोबतची जवळीक पाहता त्यांच्यामध्ये कोकणातील राजकारणावरही चर्चा झाली असावी अशीही शक्यता आहे.
याआधी अमित ठाकरे आणि नितेश राणे यांची कोकणात भेट
दरम्यान यापूर्वी जुलै महिन्यात अमित ठाकरे यांनी भाजप आमदार नितेश राणे यांची भेट घेतली होती. अमित ठाकरे यांनी पक्षबांधणीच्या कामानिमित्त जनसंपर्क अभियानाअंतर्गत कोकण दौरा केला होता. अमित ठाकरे यांनी पक्षाच्या विद्यार्थी सेनेअंतर्गत तरुणांशी संवाद साधला. याच दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे यांनी थेट राणे कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेतील. या दोघांमध्ये 30 मिनिटं चर्चा झाली. त्यावेळीही नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली होती.