Raigad News: अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
Raigad DPDC Meeting: आज रायगडच्या जिल्हा नियोजनासंदर्भात बैठक झाली. पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिटेल, असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबई: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मंत्रालयातील दालनात मंगळवारी सकाळी ऑनलाईन पद्धतीने रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील (Raigad DPDC Meeting) आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) उपस्थित नव्हते. रायगडच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि शासकीय अधिकारीच या बैठकीला उपस्थित होते. यावरुन शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महेंद्र थोरवे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, आम्हाला रायगड जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीची कोणतीही लिंक पाठवण्यात आली नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला या बैठकीची कल्पना दिली जाणे अपेक्षित होते. मात्र, ही गोष्ट आम्हाला टीव्हीवर समजली. आम्हाला कोणालाही बैठकीला बोलावण्यात आले नव्हते. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमच्या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. डीपीडीसीच्या बैठकीत हे प्रश्न आम्ही सोडवत असतो. त्यामुळे डीपीडीसीची बैठक ऑनलाईन झाली असेल तर आम्हाला लिंक पाठवली असती तर आम्हीदेखील बैठकीला उपस्थित राहिलो असतो, असे महेंद्र थोरवे यांनी म्हटले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपासून आम्हाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले का, याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करु. या बैठकीबाबत आम्हाला बोलावणे ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी होती. त्यांनी आमदारांना कळवायला हवे होते. त्यांनी आम्हाला बैठकीबाबत कळवले नाही, याचा अर्थ काहीतरी गौडबंगाल आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळाले पाहिजे, हे आम्ही सातत्याने एकनाथ शिंदे साहेबांना सांगत आहोत. आजच्या डीपीडीसीच्या बैठकीला जिल्हाधिकारी उपस्थित होते, तर त्यांनी आम्हाला कळवायला पाहिजे होते. अदिती तटकरे या बैठकीला उपस्थित राहू शकतात, तर आम्हीदेखील उपस्थित राहिलो असतो, असे महेंद्र थोरवे यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
