Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
Rahul Gandhi in Kolhapur: राजकोट किल्ल्यावरील पडलेल्या पुतळ्याने एक संदेश दिला आहे की, शिवरायांचा पुतळा उभारला जात असेल तर संबंधितांकडून त्यांच्या विचारांचं संरक्षण झालं पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
कोल्हापूर: भारत जोडो यात्रा असो किंवा अन्य कोणता कार्यक्रम असो, गेल्या काही काळापासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची थेट लोकांमध्ये मिसळण्याची वृ्त्ती सातत्याने चर्चेचा विषय ठरत असते. त्यांच्या याच साधेपणाचा प्रत्यय शनिवारी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आला. राहुल गांधी हे आज कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी कसबा बावडा येथे जाणार होते. मात्र, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर नियोजित दौऱ्याला बगल देत एका काँग्रेस कार्यकर्त्याच घर गाठले.
राहुल गांधी हे उचगाव येथील काँग्रेस कार्यकर्ते अजय सनदे यांच्या घरी गेले होते. राहुल गांधी नियोजित कार्यक्रमात बदल करुन अचानक सनदे यांच्या घरी गेले होते. त्यामुळे याठिकाणी राहुल गांधी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांना आवरताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
राहुल गांधी यांनी अजय सनदे यांच्या कौलारु घरात जाऊन पाहुणचार घेतल्याची जोरदार चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. सनदे यांच्या घरी राहुल गांधी तासभर मुक्कामाला होते, यावेळी त्यांनी सनदे कुटुंबाशी संवाद साधला. एवढेच नव्हे राहुल गांधी यांनी अजय सनदे यांच्या घरी स्वत: स्वयंपाक केला. राहुल गांधी यांनी स्वत:च्या हाताने जेवणाला कांद्याची पात आणि वांग्याची भाजी असा बेत बनवला होता. राहुल गांधी यांच्या या कृतीने सनदे कुटुंबीय भारावून गेले. तसेच राजकीय वर्तुळातही राहुल गांधी यांच्या या भेटीची चांगलीच चर्चा रंगली होती.
राहुल गांधींची भाजपवर घणाघाती टीका
राहुल गांधी यांनी कोल्हापूरमधील आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. आपली लढाई संविधान वाचवण्याची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा. मी शिक्षण घेत असताना अस्पृश्यतेसंदर्भात अनेक पुस्तकं वाचायला मिळाली. दलित आणि मागासवर्गीय यांचा इतिहास आता पुसून टाकला जात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
भारतीय संविधान हे शिवाजी महाराजांच्या विचाराचं प्रतिक आहे. मात्र, देशातील एक विचारधारा हे संविधान संपवण्याचे प्रयत्न करत आहे. हे संविधान वाचवण्यासाठी आपण लढा दिला पाहिजे. तर आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांच पाईक ठरु, असे राहुल गांधी यानी म्हटले.
आणखी वाचा