Punjab News: भगवंत मान यांनी केला सरकार स्थापनेचा दावा, मंत्रिमंडळात 17 मंत्र्यांचा होऊ शकतो समावेश
आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते आणि पंजाबचे (Punjab) नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांची भेट घेतली आहे.
Punjab: आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते आणि पंजाबचे (Punjab) नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Governor Banwarilal Purohit) यांची भेट घेतली आहे. त्यांनी राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. शुक्रवारी झालेल्या औपचारिक बैठकीत पक्षाने भगवंत मान यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. 16 मार्च रोजी स्वातंत्र्यसेनानी शहीद भगत सिंग यांच्या मूळ गावी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
भगवंत मान यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
आप नेते आणि खासदार भगवंत मान सकाळी 10.30 वाजता राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले होते. भगवंत मान यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत धुरी मतदारसंघातून 58 हजार मतांनी विजय मिळवला आहे. शुक्रवारी मोहाली येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांची राज्यातील आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर भगवंत मान यांनी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, "आम्ही ज्या ठिकाणी मतं मागायला गेलो होतो, त्या सर्वांसाठी काम करायचं आहे. सर्व आमदारांनी ते ज्या भागातून निवडून आले आहेत, तिथेच काम करायला हवं आणि फक्त चंदीगडमध्ये राहू नका."
भगवंत मान यांनी नवनिर्वाचित आमदारांना केले आवाहन
शपथविधी सोहळ्याबाबत बोलताना भगवंत मान म्हणाले आहेत की, "पंजाबभरातून लोक शपथविधीला येणार आहेत, ते भगतसिंग यांनाही श्रद्धांजली वाहतील. आपल्याकडे एक चांगले मंत्रिमंडळ असेल, जे ऐतिहासिक निर्णयांवर काम करेल, जे यापूर्वी कधीही केले नव्हते." आमदारांना आवाहन करून ते म्हणाले, "अहंकार बाळगू नका. ज्यांनी मतदान केले नाही, त्यांचंही काम करा. तुम्ही पंजाबचे आमदार आहात, सरकार पंजाबींनी बनवली आहे."
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांसोबत झालेल्या बैठकीत भगवंत मान म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त आपल्याकडे 17 कॅबिनेट मंत्री असू शकतात." ते पुढे म्हणाले की, "कोणालाही काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही सर्व कॅबिनेट मंत्री आहात."