Pune Bandh : राज्यपालांविरोधात आज पुणे बंद, बाजारपेठांसह काय काय बंद?
Pune Bandh : महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा सहभाग असणार आहे. पुणे बंदमुळे बाजारपेठांसह काय काय बंद राहणार?
Pune Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक दिली आहे. महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा सहभाग असणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील आणि इतरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे सहभागी होणार आहेत. या बंदला पुण्यातील सर्व व्यापारी संघटना, वाहतूक संघटना, गणेशोत्सव मंडळांकडून पाठिंबा देण्यात आला आहे.त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यातील सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत.
पुणे बंदमुळे काय काय बंद राहणार?
* मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद राहणार आहे.
* विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
* गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिल्याने प्रमुख गणेश मंदिरे बंद राहणार आहेत.
* शाळांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र जबरदस्ती करण्यात येणार नाही.
* पी एम पी एम एल ही सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहणार आहे.
* रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिल्याने रिक्षा बंद राहणार आहेत.
* हॉटेल्स बंद राहणार आहेत.
कसा असेल मोर्चाचा मार्ग?
या बंदच्या निमित्ताने मोर्चा काढण्यात येणार आहे. डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दहा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा अलका चौकात पोहोचेल. तिथून पुढे लक्ष्मी रस्त्यावरुन हा मोर्चा बेलबाग चौकात पोहोचेल. तिथून हा मोर्चा लाल महालात पोहोचेल. लाल महालात या मोर्चाचे सभेत रुपांतर होईल.
अपमानास्पद घोषणांवर बंदी
प्रत्येक मोर्च्यात किंवा सभेत मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातात. त्यामुळे अनेकदा गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.
पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त
पुणे बंदच्या वेळी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. अनेक ठिकाणी पोलीस तैनात असणार आहे. घोषणाबाजीला देखील बंदी करण्यात आली आहे. शिवाय साध्या वेशातील अनेक हवालदार देखील असणार आहे.