(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कबरीला भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Prakash Ambedkar : मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल थांबली असा दावा वंचितचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Prakash Ambedkar On Aurangzeb: गेल्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अचानक छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुले वाहिली होती. त्यांच्या या भेटीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान भाजप आणि शिंदे गटाकडून देखील त्यांच्यावर टीका झाली होती. आता याच भेटीवरून आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल थांबली असल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना नवी दिल्ली येथे नवी दिल्ली येथे साधतांना आंबेडकर म्हणाले की, "मी औरंगजेबाच्या कबरीवर फुल चढवली. पण माझ्या याच निर्णयामुळे जी दंगल झाली असती, ती थांबली आहे. तसेच यापूर्वी अनेकजण कबरीवर गेले आहेत. तसेच त्यांची यादीही माझ्याकडे असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच छत्रपती संभाजी राजेंना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा दिली गेली होती. सोबतच संभाजीराजे यांच्या हत्येत हिंदू देखील सहभागी होते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर संभाजीराजे संगमेश्वरला का गेले यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोहचली होती. संभाजीराजे संगमेश्वरला जयचंदमुळे गेले असा इतिहास आहे. औरंगजेबने जो दंड दिला त्याची आम्ही त्याची निंदा करतो. पण गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोहचवली होती. त्यामुळे संभाजीराजेंची हत्या, मुस्लिम धर्माशी सहमत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
फडणवीसांची प्रतिकिया...
प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिकिया दिली आहे. “प्रकाश आंबेडकर हे नवीन इतिहास लिहत असतात. परवा ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते. त्यावेळी त्यांनी जे काही वक्तव्य केले ते आपण सर्वांनी ऐकले आहे. हिंदू असो की किंवा कोणी असो हे सर्वाना सत्य माहीत आहे की, छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ आणि अत्याचार औरंगजेबाने केले होते. ते करण्याचे एकमेव कारण होते की, ते सातत्याने देश आणि धर्माची लढाई लढत होते. त्यामुळे ही लढाई सोडून आपला धर्म बदला आणि आमच्या धर्मात येऊन नतमस्तक व्हा असे त्यांना सांगितले जात होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याने अत्याचार सहन केले पण मागणी मान्य केली नाही. त्यामुळे त्यांना औरंगजेबाने मारलेलं आहे. हा इतिहास सर्वाना माहित असून, हा इतिहास बदलण्याचा कोणेही प्रयत्न करू नयेत असे फडणवीस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी आधी इतिहास तपासावा, प्रकाश आंबेडकरांनी फटकारले