(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Praful Patel : शिवरायांची ओळख असलेला जिरेटोप मोदींना घातल्याने टीकेची झोड उठली, प्रफुल पटेलांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी ट्विट करुन भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल अशी गोष्ट मनात येऊ शकत नाही, असं पटेल म्हणाले.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी काल घडलेल्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शिवप्रेमींनी प्रफुल पटेलांवर टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट बांधला जाणारा जिरेटोप प्रफुल पटेल यांच्या डोक्यावर चढवला होता. याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पटेल यांच्यावर मविआच्या नेत्यांनी टीका केली होती. प्रफुल पटेल यांनी यावर भूमिका स्पष्ट केलीय.
प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया
"हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ",असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे…
— Praful Patel (@praful_patel) May 15, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून पटेलांवर टीका
जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ट्विट करण्यात आलं होतं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांनी प्रफुल पटेल यांचे दाऊद आणि इकबाल मिर्चीसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच प्रफुल पटेलांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप नरेंद्र मोदीच्या डोक्यावर चढवला. आम्ही कुणाला देखील जिरेटोप देत नाही. प्रफुल पटेल यांना हा अधिकार कुणी दिला. नरेंद्र मोदी आणि प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचं संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :