कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी
PM Modi: मी तब्बल 24 वर्षांपासून हे सर्व सहन केल्यानंतर मला आता याचा अजिबात फरक पडत नाही, मी 'गाली प्रूफ' बनलोय असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Modi in Interview: नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) ऐन रंगात आहे. आता केवळ शेवटच्या टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया शिल्लक असून सर्वांच्या नजरा 4 जूनच्या निकालावर खिळल्यात. देशाचा नवा पंतप्रधान कोण? हाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. भाजप (BJP) हॅट्रिक करणार की, विरोधक बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. पण यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कोणी मला मौत का सौदागर म्हणालं, तर कोणी मला गंदी नाली का किडा म्हटलं. पण मी तब्बल 24 वर्षांपासून हे सर्व सहन केल्यानंतर मला आता याचा अजिबात फरक पडत नाही, असं मोदी म्हणाले आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "संसदेत आमच्या एका सहकाऱ्यानं 101 अपशब्द माझ्यासाठी बोलले होते. त्यामुळे निवडणुका असो वा नसो, हे लोक (विरोधक) मानतात की, त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते वैतागले आहेत. सातत्यानं अपशब्द वापरणं त्यांच्या स्वभाव बनला आहे."
बंगालमध्ये एकतर्फी निवडणूक : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, टीएमसी बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वासाठी लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तीन जागांवर होतो आणि बंगालच्या लोकांनी आम्हाला 80 पर्यंत नेलं. गेल्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं. या वेळी, संपूर्ण भारतात सर्वोत्तम कामगिरी करणारं कोणतंही राज्य असेल तर ते पश्चिम बंगाल असेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळत आहे. तेथील निवडणूक एकतर्फी आहे.
हायकोर्टाच्या निर्णयाबाबत पंतप्रधानांची ममता बॅनर्जींवर टीका
मुस्लिमांसाठी ओबीसी कोट्याबाबत कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशावर आणि त्यानंतरच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर ममता बॅनर्जींच्या प्रतिक्रियेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, (कोलकाता) उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर एवढी मोठी फसवणूक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे, आता ते व्होट बँकेच्या राजकारणासाठी न्यायव्यवस्थेचाही गैरवापर करत आहेत. ही परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही.
केजरीवालांनी संविधान वाचावं, पंतप्रधान मोदींचा सल्ला
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हटलेलं की, कोण तुरुंगात जाईल हे पंतप्रधानच ठरवतात. यावर पंतप्रधान मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी म्हणाले की, या लोकांनी संविधान वाचलं तर बरं होईल.