(Source: Poll of Polls)
Shivaji Maharaj Statue: चुकीला माफी नाही, तुमचं प्रायश्चित अटळ! पंतप्रधान मोदींनी माफी मागताच जयंत पाटलांनी बाण सोडला
PM Modi on Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा 28 फुटी पुतळा कोसळला होता. यावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. यावरुन पंतप्रधान मोदी यांनी शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
मुंबई: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असताना पंतप्रधान मोदी यांनी वाढवण बंदराच्या उद्घाटन सोहळ्यात शिवरायांची माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदींच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रतिहल्ला केला. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Statue) माझे आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गात जी घटना घडली त्याबद्दल आम्ही माफी मागतो. मात्र, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांना फटकारले. त्यांनी म्हटले की, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे मोदींनी माफी मागूनही महाविकास आघाडी या मुद्द्यावरुन माघार घ्यायला तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही सिंधुदुर्गातील घटनेबद्दल जाहीर माफी मागितली होती. तसेच पुढील काही दिवसांत राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा उत्कृष्ट पुतळा उभारु. त्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शेजारची खासगी जमीनही अधिग्रहीत केली जाणार आहे. शिवरायांचा नवा पुतळा भव्य आणि उत्तम दर्जाचा असेल. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिल्पकार राम सुतार यांच्यात बोलणी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी नेमकं काय म्हटलं?
मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो, तशी मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज मी मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो.
आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही जे लोक नाही, जे या भूमीचे सुपूत्र वीर सावरकरांना अपमानित करतो, शिव्या देतात. देशभक्तांच्या भावना चिरडतात. तरीही वीर सावरकरांना शिव्या देऊनही माफी मागायला जे तयार नाहीत, ते न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. देशाच्या एवढ्या महान सुपूत्राचा अपमान करुन ज्यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावेत. मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्या शिवप्रेमींचीही मी माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठे नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 30, 2024
आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.
त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही.
प्रायश्चित अटळ आहे.
जय शिवराय
आणखी वाचा