शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
Sharad Pawar: पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह 16 नगरसेवकांनी काल मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार (Sharad Pawar) सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत. पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह 16 नगरसेवकांनी काल मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. लांडेंच्या सोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवकांसह 15 पदाधिकारी ही शरद पवारांच्या तालमीत परतण्याची शक्यता आहे. लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र भोसरी विधानसभा विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गव्हाणे ही लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. परंतु महाविकासआघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला की ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार, यावर पुढची भूमिका ठरणार आहे.
राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता
काल राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह 16 नगरसेवकांनी मोदीबागेत शरद पवाराची भेट घेतली .काल संध्याकाळी ही भेट घेतली. दरम्यान आज पुन्हा हे 16 नगरसेवक शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. दुसरीकडे नेतेमंडळींना आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत. तर काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्षबदल करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय घडामोडींनीही वेग आला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटेवर
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने केवळ चार जागा लढवल्या होत्या. पक्षाला रायगड ही एक जागा जिंकता आली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटेवर आहेत, असे वक्तव्य शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...