Monsoon Session 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; 20 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार अधिवेशन
Monsoon Session 2023: संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अशी माहिती दिली आहे.
Monsoon Session 2023: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session 2023) 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांनी विधीमंडळ कामकाजात सहभाग घ्यावा आणि विविध विषयांवर चर्चा करावी, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीटद्वारे केलं आहे. 23 दिवस चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात एकूण 17 बैठका होतील, असंही ते म्हणाले आहेत.
'या' मुद्द्यांवरुन अधिवेशनात गदारोळाची शक्यता
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) यावेळी मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. संसदेच्या या सत्रात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्यावर विधेयक मांडू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे पडसाद देखील या अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणावर उपराज्यपालांना अधिकार देणाऱ्या विधेयकाबाबत मोदी सरकारला (Modi Government) विरोधाचा सामना करावा लागू शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) देशभरात फिरुन भाजपविरोधी पक्षांच्या भेटी घेत आहेत आणि या प्रकरणी सर्व भाजपविरोधी पक्षांचा पाठिंबा घेत आहेत. काँग्रेसने (Congress) मात्र अद्याप आपलं मत स्पष्ट केलेलं नाही, कारण अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या विधेयकालाही विरोध करण्यास सांगितलं आहे.
समान नागरी कायद्याबाबत पंतप्रधान मोदींनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर संसदेत गदारोळ होऊ शकतो. इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात भाजपच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचा मुद्दा सभागृहात मांडला जाऊ शकतो, ज्यावरुन गदारोळ होण्याची शक्यता आहे.
नव्या संसद भवनातील हे पहिलेच अधिवेशन
यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची (Monsoon Session 2023) खास गोष्ट म्हणजे नवीन संसद भवनात (New Parliament Building) होणारं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. नवं संसद भवन पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narednra Modi) 28 मे रोजी नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन केलं होतं. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टने या नवीन संसद भवनाच्या इमारतीचं (New Parliament Building) बांधकाम केलं आहे. दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या इमारतीत प्रत्येक मंत्र्याला वेगळं कार्यालय मिळणार आहे. आधीच्या संसद भवन इमारतीत केवळ 30 कॅबिनेट मंत्र्यांना आणि काही राज्यमंत्र्यांना कार्यालय मिळाले होते. याशिवाय नवीन संसद भवनात प्रत्येक पक्षाला वेगळं कार्यालय दिलं जाणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Shinde Fadnavis Government: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण; अशी राहिली सरकारची कामगिरी