ईशान्य मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती वाद; काय आहे मराठी, गुजराती आणि मुस्लिमांच्या मताचं गणित?
North East Mumbai Election : ईशान्य मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती वाद निर्माण केला जात असून ज्या भागात मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला जातोय.
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मुंबईत जोरदार सुरू आहे.विविध मुद्यांवर आरोपप्रत्यारोप करून मुद्दे बनविले जात आहेत. ईशान्य मुंबईत देखील हिंदू- मुस्लिमसह आता मराठी आणि गुजराती वाद (Marathi Vs Gujarati Dispute In North East Mumbai) पाहायला मिळतो आहे. येत्या 20 मे रोजी ईशान्य मुंबईमध्ये निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपकडून मिहिर कोटेचा तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 मतदारसंघात मतदान पार पडेल. मतदानाला काहीच दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील राजकीय प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात मुंबईतील 6 पैकी 3 जागांवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना समोरासमोर आहे.
ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गट विरूद्ध भाजपची लढत होणार आहे. बहुभाषिय असलेल्या या भागात पुर्नविकासाचा मोठा प्रश्न असताना या विषयाला बगल देत, सध्या या मतदार संघात मराठी विरुद्ध गुजराती तर कुठे हिंदू मुस्लिम असा वाद रंगल्याचे पहायला मिळत आहे.
मराठी-गुजराती आणि मुस्लिमांची मतदारसंख्या किती?
ईशान्य मुंबई मध्ये मुलुंड, घाटकोपर पूर्व सारखा गुजराती बहुल, तर घाटकोपर पश्चिम, भांडूप, विक्रोळी सारखा मराठी बहुल आणि गोवंडी सारखा मुस्लिम बहुल विभाग आहे. यात आकडेवारी प्रमाने पाहावे तर 7 लाख 33 हजार 493 मराठी आणि 2 लाख 9 हजार 989 गुजराती तर 2 लाख 45 हजार 575 मुस्लिम मतदार आहेत.हे मतदार इथल्या उमेदवाराला निर्णायक आघाडी देऊ शकतात. म्हणून ईशान्य मुंबईत हिंदू-मुस्लिम आणि मराठी गुजराती वाद नेहमीच पाहायला मिळतात.
गुजराती-मराठी वाद हा ईशान्य मुंबईला नवा नाही. मुलुंडमधील सोसायटी मध्ये तृप्ती देवरुखकर यांना कार्यालय देणे नाकारल्याचे प्रकरण असो की मारू घाटकोपर नावाची तोडफोड असो, हा वाद वेळोवेळी समोर येताना दिसतो.आता यावर राजकारण ही तापलेले दिसले.दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना मात्र सावध पवित्रा घेतलेला दिसला.
मूळ प्रश्न बाजूलाच राहिले
बहुभाषिक असलेल्या ईशान्य मुंबईत पुर्नविकास, डोंगराळ झोपडपट्ट्या , आरोग्य असे अनेक मोठे प्रश्न असताना या विषयाला बगल देत, सध्या या मतदार संघात मराठी विरुद्ध गुजराती तर कुठे हिंदू मुस्लिम असा वाद रंगल्याचे पहायला मिळत आहे.
या मतदार संघात गोवंडी सारख्या विभागात मुस्लिम मतदार जास्त असल्याने तिथे हिंदू- मुस्लिम वादाला हवा दिली जात आहे. मात्र या विभागातील जनता मात्र मूळ विषयांवर प्रकाश टाकताना दिसते. तर घाटकोपरमध्ये मराठी आणि गुजराती असे समसमान मतदार असल्याने इथे गुजराती विरुद्ध मराठी वाद पाहायला मिळत आहे. मात्र सामान्य नागरिकांना ही या वादावर पडदा पडावा अशी इच्छा आहे.
त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल देऊन धार्मिक आणि प्रांतीय तेड निर्माण करून मतांचे राजकारण करू पाहणाऱ्यांना यावर विचार करणे गरजेचे आहे.
ही बातमी वाचा: