Nilesh Lanke: शरद पवार सरकारी अधिकाऱ्यांना कसा दम देतात? निलेश लंकेंचा किस्सा ऐकताच राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात सगळे लोटपोट हसत सुटले
Nilesh Lanke: साहेब हसले का आणि साहेब गप्प का, या दोन गोष्टी तुम्हाला कळाल्या तर मी तुमच्यासमोर लोटांगण घालायला तयार आहे, असे वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केले.

Nilesh Lanke on Sharad Pawar: शरद पवार साहेब आजपर्यंत कधीही स्वत:साठी जगले नाहीत. त्यांनी कित्येक लोकांना खुर्चीवर बसवले. एखाद्या कार्यकर्त्याला रात्री-अपरात्री अडचण आली की पवार साहेब फोन करतात. एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला असेल तर पवार साहेब कलेक्टरला फोन करुन सांगतात, माझा कार्यकर्ता आंदोलन बसलाय, तुम्हाला गेलं पाहिजे. रास्ता रोको करताना एखाद्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आणि ही गोष्ट पवार साहेबांना (Sharad Pawar) कळाली तर आपल्या आधी एसपी आणि कलेक्टरला त्यांचा फोन जातो. त्यांना साहेब सांगतात, हा माझा कार्यकर्ता आहे, चुकीचं काही करायचं नाही, समजून घ्यायचं. साहेबांचा दम तुम्हाला माहिती नाही. ते समोरच्याला सांगतात की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागले तर मग आम्हाला विचार करावा लागेल. हा दम सगळ्यात मोठा आहे, यामध्ये खूप ताकद आहे, असे वक्तव्य खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केले. ते मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. (NCP Vardhapan Din 2025)
यावेळी निलेश लंके यांनी त्यांच्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत भाषण केले. एखादा सरकारी अधिकारी ऐकत नसेल तर प्रत्येकाची दम द्यायची पद्धत वेगळी असते. तुला उलटापुलटा करुन टाकतो, ही माझी स्टाईल आहे. जितेंद्र आव्हाडांचीही तशीच स्टाईल आहे. शरद पवार साहेबांना माझ्यासमोर एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं की, निलेश लंके माझा कार्य़कर्ता आहे, लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढत आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न केला तर पाहू आपण. त्यानंतर समोरचा माणूस महिनाभर झोपला नसेल, असे निलेश लंके यांनी सांगितले.
Sharad Pawar: साहेबांसमोर प्रिन्सिपल म्हणून जायचं नाही, आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून जायचं: निलेश लंके
निलेश लंके यांनी आपल्या भाषणात अनेक मजेशीर किस्से सांगितले. निलेश लंके यांनी म्हटले की, साहेब हसले का आणि साहेब गप्प का? या दोन्ही गोष्टींचा मला धसका आहे. त्यामुळे मी सगळ्यात जास्त भिऊन असतो. साहेब हसले का, हे गणित तुम्हाला कळालं तर तुमच्या टांगखालून जाईन. तसंच साहेब गप्प का, हेदेखील कोणाला कळालं तर मी त्या व्यक्तीसमोर लोटांगण घेईन. हे कोणाला समजलं नाही म्हणून पवार साहेब तर 55 वर्षे देशाच्या राजकारणात टिकून राहणारा नेता आहे. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही, आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून जायचं, असा सल्लाही निलेश लंके यांनी इतरांना दिला.
आणखी वाचा



















