Jayant Patil: आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम, जयंत पाटलांच्या एका वाक्याने राष्ट्रवादीत चैतन्य, शरद पवारही खुदकन हसले!
Jayant Patil NCP Adhiveshan: मोठी बातमी : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी! नव्या नेतृत्त्वाला संधी देण्यासाठी जयंत पाटील पायउतार होणार

NCP Adhiveshan Jayant Patil speech: एकेकाळी देशात भाजपचे अवघे दोन खासदार होते. आज तोच भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. आपण सगळे ताकदीने कामाला लागलो तर या राज्याची लढाई पुन्हा जिंकू. आपली लढाई ही तुकाराम विरुद्ध नथुरामाची आहे, हे कायम लक्षात ठेवा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते मंगळवारी शरद पवार गटाच्या पुण्यात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या मंचावरुन बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी नव्या नेतृत्त्वाला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आपल्याला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती शरद पवार यांना केली. या सगळ्यामुळे जयंत पाटील यांचे भाषण लक्षवेधी ठरले.
आम्ही सगळे तुकाराम महाराजांच्या विचारांचे आहोत. तुकारामांनी सांगितलं आहे, 'भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी'. आपल्याला आता रस्त्यावर उतरुन काम करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी 'तुकाराम विरुद्ध नथुराम', असा उच्चार करताच सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले. यावेळी शरद पवारांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले.
2014 साल उजाडले भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागेल. पण आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेने राहीलो. तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो प्रतिकूल असो, यश मिळो अथवा न मिळो तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व असते, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
Jayant Patil NCP President: नव्या नेतृत्त्वाला संधी देणे आवश्यक, मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा: जयंत पाटील
आजपर्यंत पवार साहेबांना मला बरीच संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे आज तुमच्या सर्वांदेखत मी पवार साहेबांना एवढीच विनंती करेन की, मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करावे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. तेव्हा जयंत पाटील यांनी आपल्या समर्थकांना शांत बसण्याचे आवाहन केले. शेवटी पक्ष हा पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आता आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या संधीसाठी मी पवार साहेबांचे आभार मानतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
मोठी बातमी : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी!























