Sharad Pawar On VBA : मविआचं ठरलं? वंचितला सोबत घेणार नाही? शरद पवारांच्या एका वाक्यामुळे चर्चेला उधाण!
साताऱ्यात बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
सातारा : लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election 2024) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) नेते वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र आपल्या उमेदवारांची घोषणा करून मविआला (MVA) मोठा धक्का दिला आहे. असे असले तरी महाविकास आघाडीकडून अजूनही संयमाची भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी साताऱ्यातील एका भाषणात या निवडणुकीबाबत एक भाष्य केलं आहे. त्यानंतर आता मविआ आणि वंचित यांच्यात पूर्णपणे बिनसलं आहे की काय? असं विचारलं जात आहे.
म्हणून मी साताऱ्यात आलो
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते शरद पवार आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी पवार यांनी साताऱ्यातील नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणात बोलताना पवार यांनी महाविकास आघाडी आणि जागावाटपावरही सविस्तर भाष्य केलं. मी मुद्दाम साताऱ्यात आलो आहे. मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. या जागेसाठी एकापेक्षा अधिक लोक आग्रही आहेत. त्यामुळे या जागेसाठीच्या उमेदवाराची येत्या दोन ते तीन दिवसांत घोषणा करू. प्रकृतीमुळे मी निवडणूक लढवू शकत नाहीये. मात्र मी पक्षाचे काम करत राहणार असल्याचे श्रीनिवास पाटलांनी सांगितले आहे, असे शरद पवारांनी सांगितले.
शरद पवार एक वाक्य बोलले अन्...
पुढे बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलं. आम्ही एकत्र आलो आहोत. उमेदवारीबाबत आम्ही चर्चा केली, असे शरद पवार म्हणाले. तसेच यावेळची निवडणूक तीन पक्षांनी एकत्र घेऊन लढवायची आहे, असंही शरद पवार म्हणाले. आमची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा चालू आहे, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. मात्र शरद पवार यांनी आपल्या भाषणात बोलताना आम्ही तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहोत, असं विधान केलं. पवारांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस हे तीन पक्षच महाविकास आघाडीचा भाग असणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पवारांच्या या एका वाक्यामुळे आता वंचितच्या मविआतील समावेशचे प्रयत्न थांबवण्यात आले आहेत का? असेही विचारले जात आहे.
3 एप्रिल रोजी संयुक्त पत्रकार परिषद
दरम्यान, येत्या 3 एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे तिन्ही घटकपक्ष संयुक्तपणे पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी मविआतर्फे महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. याच पत्रकार परिषदेत मविआ वंचितच्या समावेशावर शेवटचा निर्णय जाहीर करणार का? असेही विचारले जात आहे.