National Herald Case: राहुल गांधी 13 जूनला ईडीसमोर होणार हजर, काँग्रेसने केली ही खास तयारी
नॅशनल हेराल्ड (National Herald Case) प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार आहेत.
Congress on ED Notice To Sonia and Rahul Gandhi: नॅशनल हेराल्ड (National Herald Case) प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नसल्यामुळे ते ईडीसमोर हजर होतील, असे काँग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांना सांगितले की, कायद्याचे पालन करणारा आमचा पक्ष आहे. आम्ही नियमांचे पालन करतो. त्यांना बोलावले आहे तर ते नक्की जाणार. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, आम्ही भाजपसारखे नाही. आम्हाला आठवत की 2002 ते 2013 या काळात अमित शाह पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. खेडा म्हणाले की, आम्हाला कसलीही भीती नाही. ते लोक नियम मोडून नोटीस पाठवतात. त्यांना कळेल की ते कोणाच्या नादी लागले आहेत. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना 8 जून रोजी हजर राहण्याची नोटीस दिली आहे.
ईडीच्या समन्सविरोधात काँग्रेस करणार शक्ती प्रदर्शन?
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 13 जून रोजी ईडीसमोर हजर होणार आहेत. काँग्रेसच्या सर्व खासदारांना राहुल गांधींच्या हजेरीच्या दिवशी सकाळी पक्षाच्या मुख्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. म्हणजेच ईडीच्या समन्सविरोधात काँग्रेस शक्ती प्रदर्शन करू शकते. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत.
दरम्यान, सोनिया गांधी यांना गेल्या गुरुवारी कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल अद्याप निगेटिव्ह आलेला नाही. नॅशनल हेराल्ड प्रकरणात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीने 13 जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडीने यापूर्वी राहुल गांधींना 2 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगत हजर राहण्यासाठी दुसरी एखादी तारीख द्यावी अशी विनंती केली होती. राहुल गांधी गेल्या आठवड्यात मायदेशी परतले.