Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात पोहोचले,आजाराविषयी अपडेट समोर, कोकाटेंचे वकील देखील पोहोचले
Manikrao Kokate : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झालं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर रक्तदाब वाढल्यानं माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. नाशिकचे पोलीस माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचं वॉरंट घेऊन लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी कोकाटे यांचे वकील देखील दाखल झाले असल्याची माहिती आहे.
नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल
नाशिक पोलिसांचं म्हणजेच सरकारवाडा पोलिसांचं पथक पावणे अकराच्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल झालं आहे. यापूर्वी ते वांद्रे पोलीस स्टेशनला गेले होते. नाशिक पोलीस वांद्रे पोलीस स्टेशनमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुण लीलावती रुग्णालयात दाखल झालं आहे. लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतली जाईल. कोकाटे यांचा वैद्यकीय अहवाल पडताळला जाईल. कोकाटे यांना विश्रांतीची गरज आहे का हे पडताळून पाहिलं जाईल. उच्च न्यायालयात कोकाटे यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे.
नाशिक पोलीस वॉरंट घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांसोबत चर्चा करतील. सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. कोकाटे यांना असलेल्या उच्च रक्तदाबाचा त्रास लक्षात घेता विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना कळवल्याची सूत्रांची माहिती आहे.नाशिक पोलीस आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती आहे.
लीलावती रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत नाशिक पोलीस चर्चा करत आहेत. कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो आहे, त्यामुळं त्यांना विश्रांतीची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली गेली आहे. पोलिसांकडून डॉक्टरांनी कोकाटेंवर जे उपचार करण्यात आले त्याची माहिती घेतली जात आहे. कोकाटे यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर आणि पोलिसांच्यामधील चर्चेचा अहवाल वरिष्ठांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत पोहोचलं आहे. या पथकात दहा हवालदार तीन अधिकारी अशा एकूण 13 जणांचा समावेश आहे. आता लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या भूमिकेवर आणि वैद्यकीय अहवालावर कोकाटे यांना अटक होणार की नाही हे अवलंबून आहे.
माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे नाशिक सदनिका प्रकरणात दोषी ठरल्यानं नाशिक सत्र न्यायालयानं या दोघांच्या अटकेचं वॉरंट काढलं आहे. कमी उत्पन्न दाखवून कोकाटे यांनी सदनिका मिळवल्या होत्या. त्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं. यामुळं माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.























