Modi New Cabinet : कसं असेल मोदींचे 3.0 सरकार? देशातून किती मंत्री शपथ घेणार? महाराष्ट्राला किती वाटा मिळणार?
Narendra Modi Cabinet : एनडीएमध्ये भाजपनंतर चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम आणि नितीशकुमारांच्या जेडीयूचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे तेलुगू देसमला 4, जेडीयूला 4, लोकजनशक्ती पार्टीला 2 मंत्रिपदं मिळू शकतात.
Narendra Modi 3.0 Cabinet : नवी दिल्लीत मोदी सरकारच्या तिसऱ्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पण गेल्या दोन टर्मपेक्षा मोदींच्या तिसऱ्या सरकारचा चेहरामोहरा वेगळा असणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 52 ते 55 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री तर 33 ते 35 हे राज्यमंत्री असतील. आघाडी सरकारचा अनुभव नसलेले मोदी एनडीएचं सरकार कसं चालवणार हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे.
कसं असेल मोदींचं मंत्रिमंडळ? (Narendra Modi New Cabinet)
सगल तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. यावेळी भाजपनं बहुमताचा आकडा गाठला नसल्यानं एनडीतल्या मित्रपक्षांच्या मंत्रिमंडळातल्या जागा वाढणार आहेत. त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदाची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदाची मागणी केल्याचं समजतंय. तर महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला तीन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून कुणाला संधी
महाराष्ट्रातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. शिंदे गटाकडून संदिपान भुमरे आणि प्रतापराव जाधव यांची नावं चर्चेत आहेत. तर भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिमंडळात घ्यावं, अशी मागणी शिंदे गटाच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केल्याची माहिती आहे. पण श्रीकांत शिंदेंनी मंत्रिपद स्वीकारायला नकार दिला आहे.
एनडीएमध्ये भाजपनंतर चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम आणि नितीशकुमारांच्या जेडीयूचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे तेलुगू देसमला 4, जेडीयूला 4, लोकजनशक्ती पार्टीला 2 मंत्रिपदं मिळू शकतात. तेलुगू देसम आणि जेडीयू अर्थमंत्रालयासह सभापतीपदाची मागणी करत असल्याचं समजतंय. मात्र संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्रालय भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रपती भवनात शपथविधीच्या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधीसाठी कुणाकुणाला निमंत्रण पाठवण्यात आलंय ते पाहुयात,
- बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्स देशांचे प्रमुख
- देशभरातल्या 1,569 आमदार
- पद्म पुरस्कार मिळालेले मान्यवर
- न्याय,वैद्यक क्षेत्रासह कलाकार, प्रभावी लोक.
- विविध धर्माचे 50 धर्मगुरू
- 'मन की बात'मध्ये उल्लेख केलेले काही अफलातून लोक.
- वंदे भारतचे 10 लोको पायलट.
- सेंट्रल विस्टा उभारणारे मजूर.
- स्वच्छता कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी.
मोदी आता एनडीएचं सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे आवर्जून सांगत आहेत. पहिले दोन टर्म एनडीएचंच सरकार असलं तरी चेहरामोहरा फक्त मोदींचाच होता. आता मात्र आकड्यांचा खेळ बदलल्यानं मोदींची तिसरी टर्म कशी असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
ही बातमी वाचा: