Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : नारायण राणेंचा प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटो गायब झाल्याने रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेने नारायण राणेंचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी : भाजप की शिंदेंची शिवसेना, रत्नागिरी सिंधुदु्र्गची जागा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election) कोण लढणार याचा फैसला आता झाला असला, नारायण राणेंना (Narayan Rane) उमेदवारी मिळाली असली तरी हे दोन पक्ष मनाने एकत्र आले आहेत का असा प्रश्न अनेकांना पडलाय. काही ना काही कारणांवरून या दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी असल्याचं दिसून येतंय. आताही शिंदेंच्या शिवसेनेने भाजपच्या नारायण राणेंचा प्रचार थांबवला आहे. त्याला निमित्त ठरलंय ते नारायण राणेंचं पोस्टर. भाजपच्या पोस्टरवरून शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे गायब असल्याने त्यांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा शिंदेंच्या शिवसेनेने घेतला आहे.
प्रचार साहित्यावरून बाळासाहेब, दिघे गायब
रत्नागिरीत नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेला शिवसैनिक पुन्हा एकदा थांबला आहे. प्रचारासाठी छापून आलेल्या पत्रकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्याने आता प्रचार करणे शिवसैनिकांनी थांबवले असल्याची माहिती मिळत आहे.
महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवत आहेत. आधीच त्यांची उमेदवार घोषित होण्यास वेळ झाला आहे. शिंदेंचे शिवसैनिक आपल्यालाच उमेदवारी मिळेल या अपेक्षेत होते. मात्र अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसैनिकात नाराजी पसरली.
शिवसैनिकांत असलेली ही नाराजी दूर करण्याचे काम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून केले जात होते. आता कुठे या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्याने शिवसैनिकांनी आता प्रचार थांबवला असल्याची माहिती मिळत आहे.
शिंदेंच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवार आहेत. मात्र सिंधुदुर्गात भाजप आपल्याला विश्वासात घेऊन काम करत नसल्याचं शिंदे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. जो पर्यंत विश्वासात घेऊन काम करत नाही तोपर्यंत लोकसभेच काम करणार असल्याची शिंदे शिवसेनेने म्हटलं आहे.
भाजप-शिवसेनेमध्ये समन्वयाचा अभाव
याच पार्श्वभूमीवर कुडाळ मधील महालक्ष्मी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावस्कर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर या उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या 7 मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदानाला अवघे पंधरा दिवस बाकी असताना अजूनही शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी यांच्यात समन्वय बैठका सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसतंय.
ही बातमी वाचा: