(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole : पेशवाई सरकारकडून महाराजांचा अवमान, शिवद्रोही सरकार पुन्हा येऊ देणार नाही; नाना पटोले कडाडले
Mahavikas Aghadi Jode Maro Andolan : राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आले आहे. महाराजांच्या नावाने राजकारण करणे आणि पेशवाईसारखा महाराजांचा अपमान करणे सुरु असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
मुंबई : सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीनं सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन (Jode Maro Andolan) करण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पेशवाई सरकारकडून महाराजांचा अवमान करण्याचं काम सुरु आहे. शिवद्रोही सरकार परत येऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले की, राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आले आहे. महाराजांच्या नावाने राजकारण करणे आणि पेशवाईसारखा महाराजांचा अपमान करणे सुरु आहे. कमिशन खोरी आणि भ्रष्टाचारामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अवमान करण्याचे पाप या सरकारने केले आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा पडला. ती फक्त महाराजांची प्रतिमा नसून तर महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान राज्य आणि केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज आपण ऐकवटलो आहोत.
नाना पटोलेंनी केलं शरद पवार, शाहू महाराजांचं कौतुक
या मोर्चामध्ये महाविकास आघाडीमधील शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी प्रकृती बरी नसतानााही आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशेषपणे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचे आपल्या भाषणात कौतूक केले. विशेष म्हणजे शरद पवार आज वयाच्या 84व्या वर्षी पायाला जखम असल्याने पट्ट्या असतानाही अनवाणी पायाने आंदोलनात सहभागी झाले. यावर नाना पटोले म्हणाले की, या आंदोलनाला शरद पवार साहेब आणि खासदार शाहू महाराज तब्येत बरी नसतानाही उपस्थित राहिले. वयाचे कुठलेही बंधन न ठेवता शिवद्रोही सरकारच्या विरोधात महाराजांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी हे दोघेही उपस्थित झाले आहेत, असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि शाहू महाराज यांची स्तुतिसुमने केली.
शिवद्रोही सरकार महाराष्ट्रात येऊ देणार नाही
पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आणि आम्ही राजकारण करतोय असे विचारले जात आहे. ज्या दिवशी महाराजांचा अवमान या लोकांनी केला त्या दिवशीच महाराष्ट्राच्या जनतेने माफी मागितली की, आम्ही चुकून या सरकारला देशात आणि राज्यात आणले. त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला म्हणून पुढच्या काळात शिवद्रोही सरकार महाराष्ट्रात येऊ देणार नाही, याची शपथ आम्ही घेतली असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा