Sanjay Nirupam : संजय निरुपम यांच्या शब्दाला काँग्रेस भीक घालत नाही, स्वतःचा स्वार्थ जमला नाही म्हणून असे वक्तव्य करू नये : नाना पटोले
Nana Patole on Sanjay Nirupam : शिवसेनेने काँग्रेसच्या जागा ओढून घेतल्या आहेत, त्यांचा काँग्रेस संपवायचा डाव असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.
![Sanjay Nirupam : संजय निरुपम यांच्या शब्दाला काँग्रेस भीक घालत नाही, स्वतःचा स्वार्थ जमला नाही म्हणून असे वक्तव्य करू नये : नाना पटोले nana patole slams sanjay nirupam statement on amol kirtikar shiv sena candidate from mumbai north west lok sabha election maharashtra politics marathi Sanjay Nirupam : संजय निरुपम यांच्या शब्दाला काँग्रेस भीक घालत नाही, स्वतःचा स्वार्थ जमला नाही म्हणून असे वक्तव्य करू नये : नाना पटोले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/50dd0b4f43ebe6c5f2a56f0435fe272c171153456159493_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईच्या जागा वाटपावरून संजय निरुपम यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसचा श्रद्धांजलीचा काळ सुरू झालेला आहे अशी जहरी टीका केली होती. यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी आता संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यावर टीका केली आहे. निरूपम यांच्या शब्दाला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, स्वतःचा स्वार्थ साधला गेला नाही म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे निषेधार्थ आहे अशी टीका त्यांनी केली. लोकशाहीची श्रद्धांजली करण्याचं भाजपने जे काम सुरू केले आहे त्याच्यावर तुटून पडण्याची ही वेळ आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्याला विरोध केला होता. खिचडी चोर अमोल किर्तीकर यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच आपल्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांनी खिचडी सप्लायरकडून दलाली घेतली आहे. अशा उमेदवाराला आमच्यावर थोपवलं आहे. मी खिचडी चोराचं काम करणार नाही असं संजय निरूपम म्हणाले होते.
संजय निरुपम यांचा अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीला विरोध का आहे?
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ असल्याचा संजय निरुपम यांचा दावा आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी जरी पराभव केला असला तरी पराभवानंतर आपण या लोकसभा मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षे काम करत असून लोकसभेची तयारी जोमाने केली असल्याचं संजय निरूपम यांचं म्हणणं आहे.
शिवसेना ठाकरे गटाने दिलेले उमेदवार अमोल कीर्तीकर यांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी कडून चौकशी सुरू असताना अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यावर संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा मोठा मतदार असून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला हा मतदार पाठिंबा देऊ शकत नाही असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
अमोल कीर्तीकर यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारे निवडणुकीचा अनुभव नसताना त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणे हे योग्य नसल्याचं निरुपम यांचं मत आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)