Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
Nana Patole: राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 17 जागांवर यश मिळालं आहे. तर, महाविकास आघाडीला 49 जागांवर विजय मिळाला.
Nana Patole: मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला (MVA) महाराष्ट्रात मोठं यश मिळालं होतं. त्यामध्ये, 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले (Nana Patole) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं आहे. मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करा, मला पदावरून मुक्त करा असे पत्रच नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीत पराभव झाल्यामुळे नाना पटोले यांनी ही भूमिका घेतल्याचे समजते.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 17 जागांवर यश मिळालं आहे. तर, महाविकास आघाडीला 49 जागांवर विजय मिळाला. मात्र, भाजप महायुतीला तब्बल 237 जागांवर विजय मिळाला असून भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केल्याचं समजतं. त्याच अनुषंगाने त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त करावे, गेल्या 4 वर्षांपासून मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यामध्ये, काँग्रेस महाविकास आघाडीचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळालं. या निकालानंतरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन नाना पटोले पायउतार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, नाना पटोले यांनी राजीनाम्याचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर, आता पुन्हा एकदा पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच, नाना पटोले यांनी स्वत:च राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष पदातून पदमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती आहे. त्यामुळे, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसमध्येही नाना पटोले यांना काही बड्या नेत्यांचा अंतर्गत विरोध असल्याची माहिती आहे.
ईव्हीएमविरुद्ध आंदोलनाला दिला जोर
दरम्यान, निवडणूक निकालानंतर आता काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमविरोधात आंदोलन करत आहेत. त्यासाठी, नाना पटोले यांनी स्वत: माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला भेट देऊन ईव्हीएमविरोधी आंदोलनाला जोर देण्याचं काम केलं. यावेळी, बॅलोट पेपरवर मतदान घेत असल्यास मी राजीनामा द्यायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात