Municipal Election 2026: ...तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका
Municipal Election 2026: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

Municipal Election 2026: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे (Municipal Election 2026) बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून महाविकास आघाडीतील संभाव्य युती आणि आघाड्यांबाबत दररोज नवी समीकरणे समोर येत आहेत. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासोबतच्या युतीबाबत महत्त्वाची आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते सचिन अहिर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मुंबई आणि पुणे महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासोबत निवडणूक लढवण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चांचा पुढचा टप्पा म्हणून उद्या पुण्यात ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शुक्रवारी वाय. बी. चव्हाण केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना यांच्यात आणखी एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याचेही सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. या बैठकीत मुंबई, पुणे आणि इतर महापालिकांमधील युतीचे स्वरूप, जागावाटप आणि रणनीती यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Municipal Election 2026: मनसेसोबत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा
सचिन अहिर यांनी पुढे सांगितले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. मनसेसोबत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा आधीपासूनच सुरू असून, तिन्ही पक्ष एकत्र येऊन पुढील राजकीय रणनीती ठरवतील, असे संकेत त्यांनी दिले.
Municipal Election 2026: …तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवणार नाही
मात्र याचवेळी ठाकरे गटाने एक अट स्पष्ट करत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर अशा परिस्थितीत आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवणार नाही, असे ठामपणे सचिन अहिर यांनी सांगितले. एकीकडे युतीच्या चर्चांना वेग आला असताना, दुसरीकडे संभाव्य आघाड्यांमधील अटी आणि राजकीय सीमारेषा स्पष्ट होताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील महापालिकांमध्ये अंतिम युती कोणासोबत आणि कशी होणार, याबाबतचे चित्र पुढील काही बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील हालचालींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
























