(Source: ECI | ABP NEWS)
Mira Bhayandar MNS Morcha: रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, पहाट उजाडण्यापूर्वीच धरपकड, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी वातावरण तापलं
MNS Mira Bhayandar Morcha: मनसेकडून आज सकाळी 10 वाजता मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.

Mira Bhayandar MNS Morcha: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून मंगळवारी शहरात मोर्चा काढला जाणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून सोमवारी रात्रीपासून प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. पोलिसांनी सोमवारी सकाळपासूनच मनसे (MNS) आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, ते मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले होते.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या घरीही पोलीस येऊन गेल्याचे त्यांनी सांगितले. कालपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कशाप्रकारे कारवाई सुरु आहे आणि मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलीस किती वेगाने पावले उचलत आहेत, याबाबत गोवर्धन देशमुख यांनी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मीरा-भाईंदरमध्ये मनसेने आणि ठाकरे गटाने लावलेले सर्व फलक उतरवले आहेत. ब्रिटीश सरकार करत नसेल, अशा गोष्टी पोलीस करत आहेत. माझ्यासह मीरा भाईंदर शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व मराठी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांन नोटीस धाडल्या आहेत. पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. रात्रभर पोलिसांची पथके कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत. काहींना घरुन उचलून नेण्यात आले. माझ्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस येत होते. आमच्या घरच्यांना घाबरवून सरकार काय सिद्ध करु पाहत आहे, असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी विचारला.
Devendra Fadnavis: मराठी एकीकरण समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही नक्की मराठी राज्यात आहोत ना? स्वातंत्र्य मिळाले आहे ना देशाला?
मराठी माणसे एकत्र का येऊ द्यायची नाहीत?, असे सवाल गोवर्धन देशमुख यांनी विचारले आहेत. मराठी एकजूट का नकोय तुम्हाला, कोणासाठी आमच्यावर दादागिरी आणि दडपशाही करताय. मराठी माणूस काहीही करायचं म्हणाला तर इतकी दडपशाही आणि परप्रांतीयांना मोकळे रान. याच मिरा भाईंदरात अनेक मोर्चे आंदोलन होतात हजारोचया संख्येने परप्रांतीय रस्त्यावर उतरतात, तेव्हा पोलीस यंत्रणा का नाही इतकी तत्परता दाखवत.
दरवेळी मराठीसाठी आवाज उठविणे, आंदोलन करायचे म्हणाले तर पोलीस घरी येतात, असे पारतंत्र्यात राहिल्यासारखे का भासवता आम्हाला? बरं आपण कोणाला त्रास देतोय हे पोलिसांना सुद्धा समजू नये? हे काय आमचे खाजगी काम करतोय का आम्ही? आज मराठी माणसे एकवटणार हे कोणाच्या डोळ्यात सलतेय? राज्य सरकारची ही दडपशाही योग्य नाही. आम्ही मराठी असणे आमचा गुन्हा आहे का ?, असे अनेक सवाल देशमुख यांनी उपस्थित केले.
आणखी वाचा
























