Vasant More: बारामती मतदारसंघाच्या बैठकीत अचानक वसंत मोरेंची एन्ट्री, शरद पवारही बुचकळ्यात, नेमकं काय घडलं?
Pune News: मनसेचा पुण्यातील फायरब्रँड नेता शरद पवारांच्या भेटीला. वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत वसंत मोरे अचानक प्रकट झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पुणे: पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून (Supriya Sule) बारामती लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती . मात्र या बेठकीला राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे देखील पोहचले. वसंत मोरेंनी या आधीच मनसेकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. मंगळवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात खरं तर बैठक बोलाविण्यात आली होती शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची. मात्र, वसंत मोरे बोलावलेले नसताना या बैठकीच्या ठिकाणी पोहचले. ही बैठक सुरु असताना वसंत मोरे शरद पवारांना भेटायला आतमधे पोहचले. शरद पवारांनी दोन मिनिटे वसंत मोरेंना वेळ दिला आणि वसंत मोरे बैठकीतून बाहेर पडले. मात्र, दोन मिनीटांच्या या बैठकमुळे वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरु झाली. मात्र, वसंत मोरेंकडून याच खंडन करण्यात आलं.
शरद पवारांची प्रतिक्रिया काय?
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत होणार असल्याची शक्यता पाहता शरद पवारांन स्वत: बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घालायच ठरवलंय. त्यासाठी बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर या सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. वसंत मोरे पुण्यातील ज्या कात्रज भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते तो भाग आणि प्रभाग शिरुर लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात विभागला गेलाय. वसंत मोरेंचे स्वतःचे मतदान शिरुर लोकसभा मतदारसंघात आहे. मात्र वसंत मोरे निवडणूक लढवू इच्छितात ते पुणे लोकसभा मतदारसंघातून. त्यामुळे ते बारामतीच्या बैठकीला का पोहचले, हे आपल्यालाही समजलं नाही, असे शरद पवार म्हणाले.
वसंत मोरेंना पराभवाची भीती?
वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. मात्र, मागील निवडणुकीत ते फक्त 220 आणि ते देखील प्रभागात मनसेचे नगरसेवक म्हणून एकटेच निवडून आले. त्यामुळे वसंत मोरेंचा प्रभाव ओसरलाय का? अशी चर्चा सुरु झाली. मात्र, त्यानंतर वसंत मोरेंनी सोशल मीडियावर लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्या प्रत्येक कृतीची सोशल मीडियावर चर्चा सुरु होते. अनेकदा वसंत मोरे सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्याबद्दलच्या चर्चा आणखी वाढाव्यात यासाठी प्रयत्न करत असतात. शरद पवारांची त्यांनी घेतलेली भेट अशाच चर्चेत राहण्याचा भाग आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय .
आणखी वाचा
पुण्यात खासदारकीच्या इच्छूकांच्या रांगेत आता वसंत मोरे; भावी खासदार म्हणून शहरभर बॅनर्स