MNS workers slap Shopkeeper: दुकानदाराने माझ्याकडे माफी मागितली पण भाजप नेत्यांनी मोर्चा काढायला लावला; मीरा-भाईंदरमधील मोर्चाबाबत अविनाश जाधवांचा गंभीर आरोप
MNS Slap non Marathi shopkeeper: मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांची एकजूट, मीरा भाईंदरमध्ये बंद, मारहाणीवरुन आक्रमक. भाजप नेत्यांनी फूस लावल्याचा अविनाश जाधवांचा आरोप

Mira Bhayandar News: मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मनसेच्या या मारहाणीनंतर मिरारोड आणि भाईंदर परिसरातील काही स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करुन निषेध व्यक्त केला. तसेच या व्यापाऱ्यांनी मोर्चाही काढला होता. या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केली. मीरा-भाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या व्यापारी मोर्चाला स्थानिक भाजप (BJP) नेत्यांची फूस होती, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला. ते गुरुवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अविनाश जाधव यांनी मीरा-भाईंदरमधील स्थानिक भाजप नेत्यांवर जाणीवपूर्वक असंतोष पसरवल्याचा आरोप केला. आज जिथे बंद पाळण्यात आला तो एक लहानसा परिसर आहे. तेथील 25 ते 50 व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला होता. खरंतर आजचं आंदोलन होतं, ते व्यापाऱ्यांचं नाही तर भाजपच्या लोकांचे होते. भाजपमधील येथील नेते, पदाधिकारी, वकील आणि नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातील काही लोक आहेत, त्यांनी हे आंदोलन केले. हे भाजपने मराठी माणसाविरोधात केलेलं आंदोलन आहे, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.
भाजप नेत्यांनी दुकानदाराला मारहाण करतानाचा फक्त 40 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल केला. व्हीडिओतील तेवढाच भाग कट करुन व्हायरल करण्यात आला. त्याच्या मागे-पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. राज्य सरकारने शाळांमधील हिंदी सक्तीचे जीआर रद्द केल्याचा आनंद मनसेचे कार्यकर्ते साजरा करत होते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या दुकानदाराला मारहाण केली, त्याच्याच दुकानातून पेढे विकत घेतले होते. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आजुबाजूच्या लोकांना पेढे वाटत होते. ते पाहून या दुकानदाराने विचारलं की, कसलं सेलीब्रेशन सुरु आहे? तेव्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, राज्य सरकारने हिंदीचा जीआर रद्द केलाय, त्याच्यामुळे आम्ही आनंद साजरा करत आहोत. त्यावर या दुकानदाराने खोचकपणे म्हटले की, 'पण आमच्याकडे तर हिंदीच चालते.' त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की, तुम्हाला म्हणजे, तुम्ही राहताय कुठे, महाराष्ट्रात ना? मग या दुकानदाराला महाराष्ट्राची भाषा विचारण्यात आली. त्या दुकानदाराला याचे उत्तरही माहिती नव्हते. मग अशा लोकांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तरं द्यायची नाहीत का?, असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला.
काल दुकानदार माझ्याकडे आला होता. दुकानदाराने माफी मागितली होती आणि मोर्चा निघणार नव्हता. मात्र, आजचा मोर्चा हा भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी केला होता. आज आम्ही मंदिरात भेटून वाद मिटवणार होतो. पण भाजपने आज मराठीच्या विरोधात मोर्चा काढला, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
MNS Sandeep Deshpande: दुकानदाराचा आगाऊपणा नडला, संदीप देशपांडेंनी मीरारोडची नेमकी घटना सांगितली
त्यावेळेला जेव्हा हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला, त्यावेळी पदाधिकारी विजयाचा जल्लोष मिरवणूक काढत होते. दोन-तीन पदाधिकारी पाण्याची बॉटल घेण्यासाठी गेले त्यावेळी दुकानदाराने त्यांना विचारलं, क्या हुआ? त्या दुकानदाराने आगाऊपणा करत मीरारोड मध्ये मराठी कुठे चालते, हिंदी चालते, असे बोलला. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला हिसका दाखवला. आमची भूमिका मराठीच्या बाजूने आहे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, ही आमची भूमिका असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
आणखी वाचा
मोठी बातमी : मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांची एकजूट, मीरा भाईंदरमध्ये बंद, मारहाणीवरुन आक्रमक
























