महादेव जानकरांना सांगा, मी तुमची वाट बघतोय! पंतप्रधान मोदींनी फडणवीसांकडे पाठवला खास संदेश, मोदी नेमकं काय म्हणाले?
Mahadev Jankar : महादेव जानकरांना मत म्हणजे मोदींना मत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. जानकरांसारखा खासदार दिल्लीला पाठवणे ही आता परभणीकरांची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले.
![महादेव जानकरांना सांगा, मी तुमची वाट बघतोय! पंतप्रधान मोदींनी फडणवीसांकडे पाठवला खास संदेश, मोदी नेमकं काय म्हणाले? devendra fadanvis said narendra modi egar to wait mahadev jankar win in parliament parbhani lok sabha election ajit pawar maharashtra politics marathi महादेव जानकरांना सांगा, मी तुमची वाट बघतोय! पंतप्रधान मोदींनी फडणवीसांकडे पाठवला खास संदेश, मोदी नेमकं काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/01/0d6a85a944f8f17e1307d7a50caa6378171197078334393_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : महादेव जानकर (Mahadev Jankar) हे परभणीतून लोकसभा निवडणूक (Parbhani Lok Sabha Election) लढवणार हे माहिती झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांच्यासाठी एक खास संदेश दिला. जानकरांना सांगा, मी त्यांची लोकसभेत वाट पाहतोय असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीकरांना दिल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महादेव जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी परभणीत हजेरी लावली. त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली.
जानकरांची वाट पाहतोय, मोदींचा संदेश घेऊन फडणवीस परभणीत
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीचं काय सुरू आहे याची माहिती विचारली. तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही महादेव जानकरांचा फॉर्म भरायला परभणीत जाणार आहोत अशी माहिती आम्ही मोदींना दिली. त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, जानकरांना सांगा, मी त्यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहतोय. परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची आता त्यांची जबाबदारी आहे.
मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मोदींसाठी जाकरांनासारखा एक खासदार तुम्ही दिल्लीला पाठवणार का? असा देवेंद्र फडणवीसांनी परभणीकरांना सवाल विचारला.
जानकरांना मत म्हणजे मोदींना मत
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोर्डीकर, विटेकर, लोणीकर या तिघांची ताकत महादेव जानकर यांच्या पाठीशी आहे. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्राने 41 खासदार मोदींना दिले. यावेळी 41 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. मोदींनी सर्वसामान्य घटकांचा सर्वांगिण विकास केलाय. जे विकसित देशांना जमले नाही ते मोदीजींनी करून दाखवले. सामान्यांकरता मोदीजींनी 10 वर्षे दिलेत. पुढच्या 5 वर्षात भारत आणि महाराष्ट्र बदलणार आहे.
परभणीला एक विकास करणारा खासदार मिळाला तर सर्व बदलून जाईल. इथल्या पहिल्या खासदारांसाठी आम्हीच मतं मागितली होती. पण त्यांनी निवडून यायचे अन तुम्हाला आम्हाला, विकासाला अन संसदेला विसरून जायचे असं घडलंय. त्यामुळे आता महादेव जानकर यांना मत म्हणजे मोदींना मत आहे.
जानकर म्हणजे, मूर्ती लहान कीर्ती महान
महादेव जानकर म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, जानकरांनी माझ्यासोबत पाच वर्षे मंत्रिमंडळात काम केलं. त्यावेळी त्यांनी काही तक्रार केली नाही. सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटानं करायचे. पाच वर्षांमध्ये त्यांच्यावर एक रुपयाचा डाग लागला नाही. हा माणूस मंत्रिमंडळात आला त्यावेळी फाटका होता, जन्मभर फाटकाच राहणार. म्हणूनच लोकांच्या मनामध्ये महादेव जानकरांचं स्थान आहे.
युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि त्यांना समजावून महादेव जानकरांना ही जागा दिली असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांचे विशेष आभार मानले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)