ज्यांनी वाटुळं केलंय, 'त्या' बारामतीकरांकडे मोहिते पाटलांनी जाऊ नये; आमदार शहाजीबापूंचं आवाहन, ईडीवरुन तुफान फटकेबाजी
Solapur News: सध्या काय झालंय, कोणीतरी पोरगं लिंबाच्या झाडाखाली बसतंय आणि काही बी तयार करून फेकतंय, असं सांगताना ज्यादिवशी मोहिते पाटील उभे राहतील आणि अर्ज ठेवतील तिथून पुढं त्यांच्याविषयी भाष्य करणं योग्य ठरेल, असा टोलाही यावेळी शहाजीबापूंनी लगावला आहे.
Shahajibapu Patil on ED : सोलापूर : मला का वाटत न्हाय, मला ईडी लागल फिडी लागल का, ईडी लागत न्हाई... ईडी बी लागत न्हाय माझ्यामागं आणि शानी बी लागत न्हाय, अशा शब्दांत कोटी करीत धूर निघायला लागला की वळखायचं खाली इस्तू हाय... ज्याच्यापाशी कायतर दडलंय तिथं मग ईडी जातीय... ज्याचं त्यानं ओळखावं आणि पुढचं बघावं... ईडी (ED) काय हाय ते भुजबळ साहेबांनी मला बाकड्यावर बसून अर्धातास सांगितलं हाय... अशा शब्दांत सोलापुरातील (Solapur News) सांगोल्याचे (Sangola) विद्यमान आमदार शहाजीबापू पाटलांनी मोहिते पाटील (Shahajibapu Patil) यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. सध्या काय झालंय, कोणीतरी पोरगं लिंबाच्या झाडाखाली बसतंय आणि काही बी तयार करून फेकतंय, असं सांगताना ज्यादिवशी मोहिते पाटील उभे राहतील आणि अर्ज ठेवतील तिथून पुढं त्यांच्याविषयी भाष्य करणं योग्य ठरेल, असा टोलाही यावेळी शहाजीबापूंनी लगावला आहे.
माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ पंढरपुरात शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी आयोजित केलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात आले असता आज शहाजीबापूंनी तुफानी टोलेबाजी केली. यावेळी बापूंनी मोहिते पाटील यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आज शिवसेनेनं सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता.
ज्या मोहिते पाटलांचे बारामतीकरांनी पार वाटोळे केलं, त्या बारामतीकरांकडे त्यांनी पुन्हा जाऊ नये, असा सल्लाही देण्यास बापू विसरले नाहीत. मोहिते पाटील यांनी आता भारतीय जनता पार्टीला स्विकारलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षानं विधानपरिषदेत आमदार केलं आहे. त्यांच्या अनेक संस्थांना कोट्यावधी रूपयांचे कर्ज देऊन गाळातील संस्थांवर काढण्यासाठी सरकारनं मदत केली आहे. अशा परिस्थिती भाजप सोडण्याचा निर्णय विजयसिंह मोहिते पाटील हे कुणाला घेऊ देतील, असं वाटत नसल्याचं शहाजीबापू यांनी सांगितलं.
आता कोणत्याही मोठ्या घराण्यानं वेडंवाकडं धाडस करायचे दिवस राहिले नाहीत : शहाजीबापू पाटील
मोहिते पाटील कुटुंबाशी माझं भांडण आणि प्रेम दोन्हीही तेवढंच असल्याचं सांगताना मोहिते पाटील घराण्यानं वेडंवाकडं जाण्याचं धाडस करू नये. आता कोणत्याही मोठ्या घराण्यानं वेडंवाकडं धाडस करायचे दिवस राहिले नसल्याचं बापूनी सांगितले आहे. आणि जिथं आपलं मोहित्याचं भरपूर वाटोळं केलंय, त्याच बारामतीकडे कृपा करून जावू नये, असं मला कळतं असा सल्लाही त्यांनी मोहिते पाटील कुटुंबाला दिला आहे. माझी विजयदादा यांची भेट झाली होती, जेव्हा दादा आजारी आहेत, कळलं तेव्हा मी भेटायला गेलो होतो. तुम्हाला माढा लोकसभेची उमेदवारी हवी असल्यास तिकीट मिळविण्यासाठी जोर लावा, असा सल्लाही मी मोहिते पाटलांना दिला होता. पण तिकीट दिलं नाही म्हणून वेडंवाकडं करायचे दिवस आता राज्यात कोणत्याच मोठ्या राजकीय घरात राहिलेले नाहीत, तुम्ही कृपा करून असा वेडावाकडा विचार करू नका, असंही सांगितलं होतं, अशी माहिती शहाजीबापू पाटलांनी दिली.
मोहिते पाटील सध्या शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. माढ्यातून धैर्यशील मोहिते तुतारी हाती घेण्याची शक्यता असताना शहाजीबापू यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जातं. येत्या 13 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असून 15 किंवा 16 एप्रिल रोजी ते शक्तिप्रदर्शनानं उमेदवारी दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.