Milind Deora Resigns: तथास्तु! मिलिंद देवरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; जयराम रमेश यांची अनुल्लेखानं टीका
Milind Deora Resigns: काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Jairam Ramesh on Milind Deora Resigns: मुंबई : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सुरुवात होत आहे. अशातच मुंबईत (Mumbai Politics) मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. माजी खासदार आणि पक्षाचे वरच्या फळीतील प्रबळ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Group) जाहीर प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आज संपत आहे, असं म्हणत मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
पक्षासोबतचं 55 वर्षांचं नातं संपवतोय; मिलिंद देवरा यांचं ट्वीट
मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा शेवट होत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. माझ्या कुटुंबाचं पक्षाशी असलेलं 55 वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्ष अखंड पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे." मिलिंद देवरा यांच्या ट्वीटवर काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी मिलिंद देवरांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मिलिंद देवरा यांचं नाव न घेता, जयराम रमेश यांच्याकडून मुरली देवरांच्या आठवणींना उजाळा
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मिलिंद देवरा यांचं नाव न घेता, मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, "मुरली देवरा यांच्यासोबतचे ते दिवस मला आठवतायत. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जीवलग मित्र होते, पण ते काँग्रेसशी एकनिष्ठ होते. ते प्रत्येक कठिण काळात, अडचणींच्या वेळी काँग्रेस पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले. तथास्तु!"
दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न : नाना पटोले
मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत. दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातोय."
मिलिंद देवराजी, तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी : वर्षा गायकवाड
मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केलं आहे. "मिलिंद देवराजी, तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला खूप दुःख होतंय. आम्ही अनेक दिवस तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पक्षश्रेष्ठींनीही तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, भारत जोडो न्याय यात्रा ज्यादिवशी सुरू होते आहे, त्याच दिवशी हा निर्णय घेतला हे ही दुर्दैवी आहे.", असं ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :