सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील गुन्हेगार आणि गुन्हेगारांचा नेता धनंजय मुंडेंना अटक करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी
Maratha Kranti Morcha on Santosh Deshmukh, Baramati : मंत्री धनंजय मुंडेंना अटक करा, मराठा क्रांती मोर्चाची अजित पवारांकडे मागणी
Maratha Kranti Morcha on Santosh Deshmukh, Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने निवेदन देण्यात येणार आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून मागणी हकालपट्टी करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने उद्या अजित पवारांना पत्र देण्यात येईल. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्या केल्यानंतर बारामतीमध्ये आज (दि.21) शोक सभा तसेच घटनेचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एकमताने हा ठराव मंजूर करून उद्या अजित पवारांना धनंजय मुंडे यांना अटक करावी अशा मागणीचे पत्र देण्यात येणार आहे. गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे..
मराठा क्रांती मोर्चाने पत्रात काय म्हटलंय?
मराठा सरपंच बांधव कै. संतोष देशमुख यांचा परळी येथे नुकतीच निघुर्ण हत्या झाली. सदरची हत्या ही केवळ कै संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत व त्याचा सर्वात मोठा अडसर हा आपले पक्षाचे आमदार व मंत्री श्री धनंजय मुंडे या नेत्याला होत होता म्हणुन सदरील नेत्याने इतर गुंडामार्फत म्हणजेच वाल्मिक कराड व इतर यांचेमार्फत हत्या केलेचे दिसून येत आहे. त्यामुळे या हत्येमधील जेवढे गुन्हेगार व गुन्हेगारांचा नेता धनंजय मुंडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच धनंजय मुंडे यांची मंत्री मंडळातुन हकालपट्टी करण्यात यावी व सदरील गुन्हांचा तपास जलद गतीने व्हावा, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. भेट घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले, संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली. त्याचे दुःख सगळ्यांना आहे. इथे कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. दोषींना फाशीची शिक्षा होणार आहे. याचा कुणीही मास्टरमाईंड असेल त्याला सोडणार नाही. याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा निर्णय घेतला आहे. यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. मी सरकारच्या वतीने संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत कुणालाही सोडले जाणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या