Maratha Reservation : सलाईनमधून विष देण्याचा, माझा एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव; मनोज जरांगे पाटलांचे गंभीर आरोप
Maratha Reservation Update : सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil's Allegations : सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही माझा बळी घ्या, पण खोटे आरोप सहन करणार नाही, तुम्हाला कायमचा आयुष्यातून उठवेन अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे.
माझा बळी घ्या, पण खोटे आरोप करु नका
''माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, पण खोटो आरोप सहन करणार नाही. फडणवीस यावेळी तुमचा सुपडा साफ होणार. माझा बळी घ्या, पण खोटे आरोप करु नका,'' असंही जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरुच आहे. रविवारी जरांगेनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजासमोर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक आरोप केले आहेत.
मला मारण्याचा डाव, जरांगेंचा गंभीर आरोप
''मराठ्यांचा दरारा संपवण्याचं फडणवीसांचं लक्ष आहे. शिंदेंचे यामध्ये काही लोक असून अजित पवारांचेही दोन आमदार यामध्ये सामील आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही, सगेसोगरेतून आरक्षण द्यायचं नाही, 10 टक्के आरक्षण मराठ्यांवर लादायचं पण हे पोरगं (जरांगे) ऐकतंच नाही. हे पोरगं संपलं पाहिजे, नाहीतर त्याचा गेम तरी करावा लागेल, नसता याला बदनाम तरी करावा लागेल, नाहीतर याला उपोषणात तरी मरु द्यावं लागेल. याला सलाईनमधून विष देऊन तरी मारावं लागेल, असा यांचा विचार आहे. म्हणून मी सलाईन देखील बंद केली'', असं म्हणत जरांगेंनी गंभीर आरोप केले आहेत.
फडणवीस आणि भाजप जरांगेचा घणाघात
''अजित पवार कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाही, छगन भुजबळ कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाही, पण हे दोघे फडणवीसांच्या धाकाने गेले. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नव्हते, अशोक चव्हाण कधीच काँग्रेस सोडू शकत नव्हते, हे यांच्या धाकाने गेले. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात दरार निर्माण केली. एकदाच धनंजय मुंडे आवाज काढणार होता, त्याला आत टाकू का म्हटला, धनंजय गप्प बसला. ज्याने भाजप उभा केला, त्या गोपीनाथ मुंडेच्या मुलीची काय अवस्था केली. एकनाथ खडसे ज्याने भाजप उभी केली, त्याची काय अवस्था केलीय'', असं म्हणत जरांगेनी फडणवीस आणि भाजपवर घणाघात केला आहे.
सगेसोयरेची अंमलबजावणी घेणारच, जरांगेची स्पष्ट भूमिका
सगेसोयऱ्यांची अंमलबाजवणी करुन घेणारच, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. 23 डिसेंबर ते 25 फेब्रुवारीपर्यंत समितीने आजपर्यंत काय केलं, असा सवाल जरांगेंनी विचारला आहे. सरकार फडणवीसांच्या सांगण्यावरून प्रमाणपत्र बंद केलं. माझ्या विरोधात दोन माणसे अंबड आणि गेवराई तालुक्यातील दोन जण नेलेत, नारायण राणे यांच्या माध्यमातून मी काय चूक केली. माझे दुसरे गुन्हे काढणार. तुला माझा बळी पाहिजे तर सागर बंगल्यावर येतो, असं म्हणत जरांगेनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :