Manoj Jarange Patil Mumbai Morcha: राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन; विखे पाटील अध्यक्षपदी, महाजन, भूसे, सामंत, कोकाटेंचाही समावेश
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha मुंबई: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची निवड करण्यात आली. याआधी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपसमितीचे अध्यक्ष होते. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिय सुरळीत राबवणे, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत.
मराठा समाजाच्या उपसमितीत कोण कोण?
१. राधाकृष्ण विखेपाटील, जलसंपदा मंत्री - अध्यक्ष
२. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री - सदस्य
३. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री - सदस्य
४. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री - सदस्य
५. उदय सामंत, उद्योग मंत्री - सदस्य
६. शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री - सदस्य
७. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री - सदस्य
८. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री - सदस्य
९. माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री - सदस्य
१०. मकरंद जाधव, मदत व पुनर्वसन मंत्री - सदस्य
११. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री - सदस्य
१२. सचिव - सामान्य प्रशासन विभाग - उपसमितीचे सचिव
29 ऑगस्टला मनोज जरांगे मुंबईत धडकणार-
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केलाय. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी ज्या मार्गी मुंबईला जायचं आहे त्या मार्गात काही बदल करण्यात आल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. यावेळी अंतरवालीतून पैठणमार्गे आम्ही पुढे जाणार. शिवनेरीत मुक्काम करणार. त्यानंतर चाकणमार्गे वाशी आणि आझाद मैदान अशा मार्गाने जाणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
आम्ही शांततेत मुंबईत जाणार, आरक्षण घेणार- मनोज जरांगे
मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, माणूस किती दलबदलू असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांनी तसं वागू नये. त्यांना सत्तेवर ठेवायचं नसतं तर मराठ्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं का? त्यांच्या मनात काय आहे ते माहिती नाही. पण आम्ही शांततेत मुंबईत जाणार, आरक्षण घेणार, असं जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस बघून घेतील. सत्ता असेल तर सगळं काही करता येईल या गैरसमजातून त्यांनी बाहेर यावं. तुम्ही एखाद्याला हात लावून दाखवा, मग सांगतो असा इशारा जरांगेंनी दिला.
























