Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना अचानक मंत्रिपदाची लॉटरी; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले अजित पवार...
Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना मंत्रिपद मिळणार असल्याचं समोर येताच मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ येणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा खातं पुन्हा भुजबळांकडे जाण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर भुजबळांचा पत्ता कट झाला होता. त्यानंतर भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समता परिषदेच्या जागोजागी सभा, मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. मात्र अजित पवारांची साथ सोडली नव्हती. आता भुजबळ मंत्रिमंडळात परतत आहेत.
छगन भुजबळांना मंत्रिपद मिळणार असल्याचं समोर येताच मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.
मराठ्यांना संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय- मनोज जरांगे
जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रिपद दिलं जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल. छगन भुजबळांना तात्पुरता नादी लावलं असेल, चॉकलेट दिलं असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विरजण पडेल. अजित पवार जातीयवादी लोकं पोसण्याच काम करत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल. छगन भुजबळ जातीयवादी आहे, त्यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता. छगन भुजबळांना मंत्रिपद द्या, हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले. मराठ्यांना संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणलं, त्या माणसाला फडणवीसांनी क्रॉस करून टाकलं. काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे, असा निशाणाही मनोज जरांगे यांनी साधला.
ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल- छगन भुजबळ
"ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल", ज्याचा शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली. मंत्री पदाबाबत आठ दिवसांपूर्वीच निर्णय झाला होता. बैठकीमध्येच ही गोष्ट ठरली होती आणि सोमवार ऐवजी मंगळवारी शपथविधी होईल, असं ठरलं. कारण मंगळवारी मंत्रीमंडळातील नेते आणि इतर लोक असतात, म्हणुन हा दिवस निवडला असल्याचेही छगन भुजबळ म्हणाले.























