![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
जरांगे फॅक्टरचा अनेक मतदारसंघांमध्ये परिणाम झाला, आमदार संतोष बांगर यांना जनतेचा कौल मान्य
Santosh Bangar : हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलली हा पक्षाचा निर्णय होता. हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्याचा कुठलाही प्रकारची नाराजी वाटत नाही, असंही आमदार संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
![जरांगे फॅक्टरचा अनेक मतदारसंघांमध्ये परिणाम झाला, आमदार संतोष बांगर यांना जनतेचा कौल मान्य Manoj Jarange Patil factor had an impact in many constituencies Says MLA Santosh Bangar Hingoli Lok Sabha 2024 Maratha Reservation marathi News जरांगे फॅक्टरचा अनेक मतदारसंघांमध्ये परिणाम झाला, आमदार संतोष बांगर यांना जनतेचा कौल मान्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/34feb5de5b1acb1dfb90f3d395cd84311718453676462322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हिंगोली : जरांगे फॅक्टरचा (Manoj Jarange Patil) अनेक मतदारसंघांमध्ये परिणाम झाला असून जनतेचा कौल मान्य असल्याचं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी बदलली हा पक्षाचा निर्णय होता. हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्याचा कुठलाही प्रकारची नाराजी वाटत नाही. पक्षाचे धोरण असतं, ते अंतिम असतं, असंही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे. हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसला आहे. हिंगोली लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर यांचा विजय झाला आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाने सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींचा पत्ता कापून राजश्री पाटील यांना रिंगणात उतरवले होते. पण, तेथेही ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले. जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला नापसंती दर्शवल्याने शिंदे गटाला फटका बसला आहे. तसेच यावर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा देखील परिणाम झाला आहे.
जरांगे फॅक्टरचा अनेक मतदारसंघांमध्ये परिणाम झाला
संतोष बांगर म्हणाले की, संविधान बदलणार यासारख्या अनेक मुद्द्यावर लोकांची दिशाभूल करण्यात आली. समाजामध्ये वातावरण दूषित करण्याचे काम केलं आणि यामुळेच आम्हाला हार स्विकारावी लागली आहे. हेमंत पाटलांचे उमेदवारी बदलली हा पक्षश्रेष्ठींचा विषय असतो. पक्षश्रेष्ठींनी जो उमेदवार दिला, त्या पद्धतीने सर्व शिवसैनिक कामाला लागले, त्यामुळे उमेदवार बदलीची कुठल्याही प्रकारची मला माहिती नाही. पक्षश्रेष्ठींनी जो उमेदवार दिला, त्यांचा आम्ही काम काटेकोरपणे केलं आहे.
कळमनुरी विधानसभेवरती झेंडा फडकवू
हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्याची कुठलाही प्रकारची नाराजी वाटत नाही. हेमंत पाटील आजही आमचे नेते आहेत. माझे मित्र आहेत. पक्षश्रेष्ठींनी ठरवलं होतं, त्यानुसार राजश्री पाटील यांनी यवतमाळ लोकसभेची उमेदवारी दिली. या ठिकाणी बाबुराव कदम दिले, त्यामुळे पक्षाचे धोरण असतं, ते अंतिम असतं. कळमनुरी मतदारसंघांमध्ये दौरे वाढवण्याची गरज नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फार फरक असतो. कुठल्याही प्रकारची जात-पात, धर्म न बघता आम्ही काम करत असतो. त्याच ताकदीच्या जोरावरती पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज आम्ही कळमनुरी विधानसभेवरती फडकवू, असं बांगर म्हणाले.
आमदार संतोष बांगर यांना जनतेचा कौल मान्य
जरांगे फॅक्टरवर भाष्य करताना संतोष बांगर यांनी म्हटलं, रावसाहेब दानवे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील या मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे पाटलांचा परिणाम झालेला आहे. जिथे ही पचवण्याची ताकत असली पाहिजे आणि हारही पचवण्याची ताकद असली पाहिजे. जनतेचा जो कौल आहे, तो मान्यच करावा लागेल,असंही आमदार संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)