(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mangaldas Bandal : वंचितचा मोठा निर्णय! फडणवीसांसोबत बैठकीला जाणं भोवलं, मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी रद्द
Mangaldas Bandal : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. आता त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई: शिवसेना शिंदे गटानंतर आता वंचित बहुजन आघाडीवर (Vanchit Bahujan Aghadi) आपला जाहीर केलेला उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आली आहे. वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांची उमेदवारी मागे घेतली आहे. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने हा निर्णय घेतल्याचं वंचितकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते. त्यावरून वंचितवर मोठी टीका होत होती. त्याची दखल घेऊन वंचितने आता मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हटलंय वंचितने?
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.
बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.
मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 6, 2024
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला… pic.twitter.com/xLhMymXn3o
आतापर्यंत चार उमेदवार मागे
वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले होते. त्यापैकी चार उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र नंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आल्याने वंचितला मोठा धक्का बसला.
ही बातमी वाचा: