आम्ही पण 'दादा'गिरीतून आलो आहोत;सदा सरवणकरांच्या वक्तव्यावरुन महेश सावंत एकनाथ शिंदेंसमोरच संतापले
तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिला, त्याने स्वतचा विकास केला. त्यामुळे, आता तुम्ही त्यांना समज द्या अशी भूमिका महेश सावंत यांनी एकनाथ शिंदेंसमोर घेतली.

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर (Sada sarvankar) यांच्या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ उठला असून विरोधी पक्षातील आमदारांच्या निधीचा प्रश्न नव्याने समोर आला आहे. मुंबईतील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत (Mahesh sawant) निधीच्या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीत थेट पोस्टर दाखवत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या वक्तव्याचा त्यांनी उल्लेख केला. आमदारांना 2 कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो, असे वक्तव्य सरवणकर यांनी केले होते. त्यामुळे, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याच मुद्द्यावरुन चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे पण आम्ही पण 'दादा'गिरीतून आलो आहोत, असे त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर म्हटलं.
तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिला, त्याने स्वतचा विकास केला. त्यामुळे, आता तुम्ही त्यांना समज द्या अशी भूमिका महेश सावंत यांनी एकनाथ शिंदेंसमोर घेतली. माजी आमदार बोलत आहे की आम्हाला 20 कोटी रुपयांचा निधी भेटतो आणि आम्हाला निधी मिळत नाही. तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे पण आम्ही पण 'दादा'गिरीतून आलो आहोत. माजी आमदारांना तुम्ही खूप निधी दिला आहे, पण कामे झाली नाहीत, त्यांनी तो निधी स्वत:चा विकास करण्यासाठी वापरला आहे. साहेब तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी, त्यांना कानमंत्र द्या असेही महेश सावंत यांनी एकनाथ शिंदेंना म्हटले. दरम्यान, आम्हाला निधी द्या आम्ही अनेक पत्रके दिली आहेत, अशी आठवणही त्यांनी करुन दिली.
दरम्यान, मुंबईतील माहिम किल्ल्याच्या बाजूला सुशोभीकरण करण्याची गरज आहे, त्याकडे लक्ष घालावे. माहिम येथे साइक्लिंग ट्रॅक तयार करावे, त्यासाठी पालकमंत्र्यांनी निधी द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. माहिममध्ये 2 शाळा आहेत, त्यातील एक जमीनदोस्त झाली आहे, 1 शाळा उरली आहे. त्यामुळे, डागडुजी करून तिथेच वर्ग करून द्यावी अशी विनंती असल्याचंही त्यांनी म्हटलं. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकासमोर हत्तीचा आकर्षक पुतळा होता पण अद्याप मेट्रो आणि पालिकेत ताळमेळ नाही. म्हणून तो अद्याप बसविलेला नाही. दादर विभाग हा मुंबईचा महत्त्वाचा भाग आहे, त्याचे पोलीस स्थानक हे म्हाडाच्या इमारतीत आहे, त्याला एक स्वतंत्र अशी जागा द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. तर, मुंबईत जेथे पुतळे आहेत, तेथे सीसीटीव्ही लावा, अशी मागणी देखील आमदार महेश सावंत यांनी केली.
हेही वाचा
संतापजनक! इंस्टावर मैत्री करुन संबंध ठेवले; व्हिडिओ बनवून 7 जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
























