Maharashtra Vidhansabha 2024: शिंदे गटाला मोठा धक्का, सईद खान यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा गटच फोडला, पाथरीतून रासपच्या तिकीटावर शड्डू ठोकला
मी ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. 29 ऑक्टोबरला माझा अर्ज मी भरणार आहे, असं सईद खान यांनी सांगितलं आहे.
Parbhani: राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असताना परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना अल्पसंख्यक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान (Saeed Khan) यांनी उमेदवारी मिळाली नसल्याने सर्व पदाधिकाऱ्यांसह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर 29 तारखेला राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी महादेव जानकर देखील उपस्थित राहणार आहेत. तर आमदार राजेश विटेकर यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मला दोन वर्षे सहकार्य केले मी त्यांच्यावर नाराज नाही असे सईद खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना पाथरी मतदारसंघातून उमेदवारी ने मिळाल्याने साधारण 500 पदाधिकाऱ्यांसह आपले राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहेत. महायुतीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने सर्वच शिवसैनिक नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
सईद खानांसहित पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्यासह पदाधिकारी, जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बंद पुकारलं आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने जवळपास ५०० जणांनी आपले सामुहिक राजिनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुपूर्द केले आहेत.
पाठीत खंजीर खुपसल्याचा राजेश विटेकरांवर आरोप
सईद खान यांनी विटेकरांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. सईद खान हे मागील दोन वर्षांपासून पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचं आश्वासनही दिलं होतं. पण अचानक जागावाटपाच्या तिढ्यात पाथरी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याने शब्द फिरवत माझ्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप सईद खान यांनी केलाय.
राजेश विटेकर जेव्हा विधानपरिषद निवडणूक लढवत होते, तेव्हाही मी त्यांना मदत केली. मला त्यांनी विधानसभेसाठी मदत करणार असल्याचा शब्द दिला होता. परंतु त्यांनी अखेरीस शब्द फिरवत माझ्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका सईद खान यांनी केली.
रासपकडून लढवणार पाथरी विधानसभा
ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. 29 ऑक्टोबरला माझा अर्ज मी भरणार आहे, असं सईद खान यांनी सांगितलं आहे. सईद खान हे शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. २९ तारखेला महादेव जानकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.