काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित; आज विधान परिषदेची निवडणूक, महाविकास आघाडीची वाढली धाकधूक
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 मुंबई: आज विधान परिषदेची निवडणूक (Maharashtra Legislative Council Election) होणार आहे. विधीमंडळात मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान काँग्रेस आमदारांच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
काल रात्री उशीरा (11 जून) काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसकडून रमेश चैनीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या आमदारांना मार्गदर्शन केले.
काँग्रेसचे पुढील आमदार बैठकीला उपस्थित-
केसी पाडवी
सुभाष धोटे
कैलास गोरंट्याल
विश्वजीत कदम
शिरीष चौधरी
विजय वड्डेटिवार
नाना पटोले
पृथ्वीराज चव्हाण
धीरज देशमुख
अमित देशमुख
रवींद्र धंगेकर
संग्राम थोपटें
अस्लम शेख
अमीन पटेल
बाळासाहेब थोरात
रंजित कांबळे
कुणाल पाटील
नितीन राऊत
सुलभा खोडके
मोहन हंबीरडे
हिरामण खोसकर
राजेश एकाडे
अमित झनक
मारुती करोटे
माधवराव जवळकर
सुरेश वडपूरकर
लहू कानडे
चंद्रकांत जाधव पत्नी
राजू आवळे
विक्रम सावंत
ऋतुराज पाटील
स्वरूप नाईक
विकास ठाकरे
पक्षाला कळवून गैरहजर-
संजय जगताप
यशोमती ठाकूर
अनुपस्थित असलेले आमदार-
झीशान सिद्दीकी
जितेश अंतापूरकर
काँग्रेसकडून आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी-
आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या अकरा जागांसाठी शुक्रवार, दिनांक १२ जुलै, २०२४ रोजी मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधान भवन, मुंबई येथे मतदान होणार आहे, मतदानाची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आहे. महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाच्या सर्व विधान सभा सदरयांनी सदर निवडणुकांच्या मतदानात सहभागी होणे अनिवार्य असून त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे. या पक्षादेश नुसार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यासंदर्भातील सूचना आपणांस दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता दालन क्र. १२६, पहिला मजला, महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्ष कार्यालय, विधान भवन, मुंबई येथे देण्यात येणार आहे. पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मतदान करावे असा पक्षादेश आहे, असं काँग्रेसच्या व्हीपमध्ये म्हटलं आहे.
महायुतीचे 9, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार-
विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले असून विरोधी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पाच उमेदवारांसह भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
पक्षीय बलाबल काय?, जाणून घ्या-
महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे. प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे. 11 MLC चा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे.