MLC Result शिवसेनेचं काऊंटडाऊन सुरु झालंय, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
MLC Election result नागपूरमध्ये भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या मंगेश देशमुख यांचा पराभव केला. तिकडे अकोला -वाशिम-बुलढाण्यातही भाजपने विजय मिळवला.
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) दोन जागांच्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aaghadi) धोबीपछाड दिली. नागपूर आणि अकोला या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. नागपूरमध्ये भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या मंगेश देशमुख यांचा पराभव केला. नागपुरात काँग्रेस-महाविकास आघाडीची 16 मते फुटली. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार मंगेश देशमुख यांच्या पदरात केवळ 186 मते पडली. त्यामुळे बानवकुळे यांचा 176 मतांनी विजय झाला.
तिकडे अकोला -वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडल्या जाणाऱ्या जागेवर शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांना मोठा धक्का बसला. तीनवेळा विजय मिळवलेल्या बाजोरिया यांचा रथ भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी रोखला. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला. तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल 'जायंट किलर' ठरले आहेत. खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. तर, बाजोरिया यांना 334 मते मिळाली. तर, 31 मते अवैध ठरली.
प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
दरम्यान या विजयानंतर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
चार जागांवर भाजप विजयी झालेली आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सत्तेत असले तरी जनता भाजपच्या सोबत आहे हे यावरून दिसते. नागपूरची जागा प्रचंड मतांनी जिंकली. अकोल्याची शिवसेनेची जागा भाजपने जिंकली. महाविकास आघाडीची क्षमता नाही. भाजपच्या मागे आज राज्यातील जनता आहे. तिन्ही पक्षातील अस्वस्थ लोक आहे ती देखील आहेत. नागपूरमध्ये मतं फुटली आहेत. आता शिवसेनेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला.
नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा
भाजप हाच राज्यात मोठा पक्ष आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे नेतृत्व करतात. या पराभावाची नैतिक जबाबदारी नाना यांनी स्वीकारून रानीनामा द्यावा अशी मागणी आता काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. घोडेबाजार नाना तुम्ही केला. आम्ही आमचे नगरसेवक बाहेर ठेवणे यात गैर काय? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.
ट्यूशनपासून काँग्रेस लांब गेलेली आहे. आम्हाला ट्यूशनची आवश्यकता नाही, असा पलटवार दरेकर यांनी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर केला.
काँग्रेसचा आत्मसन्मान हरवला आहे. सत्तेत असतानाही त्यांच्या नेत्याला परवानगी न मिळणे याचा विचार होणे गरजेचे आहे, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या सभेवर भाष्य केलं.
केंद्रात मोदी शेतकऱ्यांसाठी दोन पावले मागे येत असतील तर राज्य सरकारने देखील एसटी कर्मचाऱ्यांसाठी दोन पावले मागे यायला हवे, असं दरेकर म्हणाले.
VIDEO प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक निकाल (Maharashtra Vidhan Parishad result 2021)
> नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) : 362
मंगेश देसाई (काँग्रेस) : 186
रविंद्र भोयर : 01
अवैध : 5
> अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
वसंत खंडेलवाल (भाजप) : 443
गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) : 334
अवैध मते : 31
संबंधित बातम्या
मिटकरी म्हणाले, भाजपने पैशाने निवडणूक जिंकली, चंद्रकांत पाटील म्हणतात, वा वा वा वा!